
सोरतावडी येथे अपघातात एक ठार, चार जण जखमी
उरुळी कांचन, ता. १३ : सोरतापवाडी (ता. हवेली) येथे पुणे-सोलापूर महामार्गालगत चारचाकीने रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाला; तर चार जण जखमी झाले आहेत.
भानुदास गोरे (वय अंदाजे ५०, रा. थेऊर, ता. हवेली, मूळ रा. लातूर), असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सुनीता जगताप व इंदू जगताप (रा. दोघीही, बेलसर, ता. पुरंदर), विष्णू राजाराम अंधारे व छाया अंधारे (रा. दोघेही सोरतापवाडी) असे किरकोळ जखमी झालेल्या नावे आहेत. जखमींना उरुळी कांचन येथील कस्तुरी प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेतून उरुळी कांचन येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठविण्यात आले. या अपघातात भानुदास गोरे यांच्या छातीला व डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचे उपचारापूर्वीच निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
सकाळी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास हडपसरवरून उरुळी कांचनच्या दिशेने एक रिक्षावाला (क्र. एम.एच. १२ आर.पी. ७०५६) निघाला होता. रिक्षा सोरतापवाडीतून पुढे उरुळी कांचनच्या दिशेने निघाली असताना अचानक सोलापूरच्या बाजूकडे जाणाऱ्या एका चारचाकी वाहनाने रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिली. या रिक्षात ५ प्रवासी प्रवास करीत होते. हा अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये रिक्षा पलटी होऊन रिक्षात बसलेल्या ५ प्रवाशांना गंभीर दुखापत झाली.