
महिलेच्या विनयभंगप्रकरणी एकास अटक
उरुळी कांचन, ता. ८ : शाळेतील मुलांचे दाखले काढून देण्याच्या बहाण्याने ९१ हजार रुपये घेऊन काम न करता फसवणूक केली तसेच महिलेचा विनयभंगही केला. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी एका यु ट्युब चॅनलच्या तथाकथित पत्रकाराला अटक केली. हा प्रकार कदमवाकवस्तीतील शाळेत जानेवारी ते २१ मार्च २०२३ दरम्यान घडला आहे.
हनुमंत राजकुमार सुरवसे (वय २७, रा. हवेली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत हिंजवडीतील एका ४९ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे.
आरोपी हनुमंत सुरवसे हा फिर्यादीच्या ओळखीचा आहे. फिर्यादी यांच्या दोन मुलांचे शाळेचा दाखल काढून देण्यासाठी सुरवसे याने ९१ हजार रुपये घेतले. तरीही त्यांना शाळेचा दाखला काढून दिला नाही. त्यामुळे पैसे मागण्यासाठी फिर्यादी कदमवाकवस्तीत आल्या होत्या. तेथे त्यांनी सुरवसे याला पैशांबाबत विचारले. त्यावेळी त्याने फिर्यादीस अश्लील शिवीगाळ करून विनयभंग केला व त्यांना ढकलून दिले. लोणी काळभोरचे पोलिस उपनिरीक्षक प्रमोद हंबीर याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.