उरुळी कांचन येथे पालखी विसावा नसणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उरुळी कांचन येथे पालखी विसावा नसणार
उरुळी कांचन येथे पालखी विसावा नसणार

उरुळी कांचन येथे पालखी विसावा नसणार

sakal_logo
By

उरुळी कांचन, ता. २० : जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या सोहळा प्रमुखांनी १० जून ते २८ जून या दरम्यानचा पालखी सोहळ्याच्या प्रवासाचा तपशीलवार कार्यक्रम जाहीर केला असून त्यामध्ये उरुळी कांचनचा दुपारचा विसावा परंपरेनुसार ग्रामदैवत काळभैरवनाथ मंदिरात न होता तो पुणे- सोलापूर महामार्गावरच वेगळ्या पद्धतीने व्यवस्था केलेल्या ठिकाणी होईल, असे जाहीर केल्याने उरुळी कांचन व पंचक्रोशीतील वैष्णवांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
या पार्श्वभूमीवर, संत तुकाराम महाराज पालखी सोहळा उरुळी कांचन (ता. हवेली) येथे दुपारच्या विसाव्यासाठी काळभैरवनाथ मंदिरात येणार नसल्याने येथील ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन करण्याचा पवित्रा हाती घेतला आहे. संत तुकाराम महाराज पालखी ही पूर्व हवेलीतील लोणी काळभोर या ठिकाणी मुक्कामास असते. त्यानंतर पुढे उरुळी कांचन येथे दुपारी विसाव्यास येते. मात्र, यंदा उरुळी कांचन येथे पालखी विसाव्यास थांबणार नसल्याचे हवेलीचे प्रांत अधिकारी आणि सोहळा प्रमुखांनी जाहीर केले आहे.
उपविभागीय अधिकारी हवेली आणि उपविभाग पुणे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता. १९) पुणे उपविभागीय कार्यालयात पूर्व हवेलीतील पुणे - सोलापूर महामार्गावरील गावांतील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्या बैठकीचे करण्यात आले होते. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा उरुळी कांचन येथे दुपारच्या विसाव्यासाठी काळभैरवनाथ मंदिरात येणार नसल्याने ग्रामस्थ व पालखी सोहळा प्रमुख यांच्यात प्रांत अधिकारी संजय आसवले यांच्यासमोर प्रचंड वादावादी झाली. या वादावादीत कोणताही तोडगा निघाला नाही. परंतु, संत तुकाराम महाराज संस्थानचे सोहळा प्रमुख यांनी पालखी सोहळा गावातून मंदिर मार्गी महात्मा गांधी विद्यालयाच्या भव्य पटांगणावर किंवा पुणे - सोलापूर पीएमपी थांबा याठिकाणी विसाव्यासाठी थांबवावा, असे पर्याय सुचवले. मात्र, या पर्यायाचा तीव्र निषेध करत पालखी सोहळा विसाव्यासाठी काळभैरवनाथ मंदिरात येणार नसेल तर पालखी सोहळा हा उरुळी कांचन मार्गी जाऊ देणार नाही, असा इशारा उरुळी कांचन सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी दिला.
दरम्यान, उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हाधिकारी, प्रांत व तहसीलदारांना निवेदन देऊन नेहमीच्या प्रथा परंपरेनुसार संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा विसावा उरुळी कांचन येथील काळभैरवनाथ मंदिरातच घ्यावा, अशी मागणी केलेली आहे.