
तुकोबांच्या पालखी सोहळ्याचा उरुळी कांचन येथे विसावा
उरुळी कांचन, ता. ९ : संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पूर्व हवेलीतील उरुळी कांचन (ता. हवेली) येथे दोन तास विसाव्यासाठी थांबणार असून लोणी काळभोर गावातील विठ्ठल मंदिर येथे मुक्कामाला थांबणार असल्याचे हवेली प्रांत अधिकारी संजय आसवले यांनी नुकतेच जाहीर केले आहे. या निर्णयामुळे वैष्णवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुखांनी १० जून ते २८ जून यादरम्यानचा पालखी सोहळ्याच्या प्रवासाचा तपशीलवार कार्यक्रम जाहीर केला होता. यामध्ये उरुळी कांचनचा दुपारचा विसावा परंपरेनुसार ग्रामदैवत काळभैरवनाथ मंदिरात न होता तो पुणे- सोलापूर रोडवर व्यवस्था केलेल्या ठिकाणी होईल असे जाहीर केले होते. तर लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील विठ्ठल मंदिरात मुक्काम न ठेवता कदमवाकवस्ती या ठिकाणी स्वतंत्र पालखी तळाची व्यवस्था करण्यात आली होती. या निर्णयामुळे पूर्व हवेलीतील ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन करण्याचा पवित्रा हाती घेतला होता. ५ जूनपर्यंत जगद्गुरू संत तुकाराम महाराज संस्थान देहूच्या पालखी सोहळा प्रमुखांनी उरुळी कांचन पालखी विसाव्यास ठेवणार नाही की ते कळवावे अन्यथा ग्रामस्थ सत्याग्रह, गावबंद, रास्ता रोको आंदोलन करणार असा इशारा देण्यात आला होता. तसेच लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील विठ्ठल मंदिरात मुक्काम न ठेवल्यास पूर्णतः असहकार्याची भूमिका घेण्याचा निर्णय ग्रामस्थांकडून घेण्यात आला होता.
दरम्यान, पूर्व हवेलीतील लोणी काळभोर (ता. हवेली) येथील विठ्ठल मंदिर या ठिकाणी परंपरेनुसार पालखी मुक्कामास असणार आहे. तसेच उरुळी कांचन येथील ग्रामदैवताच्या मंदिरासमोर आरती घेणार असून, त्यानंतर पालखी सोहळा महात्मा गांधी विद्यालयाच्या पटांगणावर विसाव्यासाठी २ तास थांबणार असल्याचे हवेली प्रांत अधिकारी यांनी जाहीर केले आहे.