
मावळ कृषी उत्पन्न बाजार समिती
वडगाव मावळ, ता. १९ : मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक बुधवारी (ता.२४) होणार असल्याची माहिती निवडणूक अधिकारी शिवाजीराव घुले यांनी दिली. दरम्यान, प्रदीर्घ काळानंतर निवडणूक होऊन घवघवीत यश मिळाल्याने आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून या पदांसाठी कोणाला संधी दिली जाते, याबाबत तालुक्यात मोठी उत्सुकता आहे.
मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक २८ एप्रिल रोजी झाली होती. त्यात १८ पैकी १७ जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेस प्रणीत महाविकास आघाडीच्या सहकार पॅनेलने निर्विवाद वर्चस्व मिळवले व बाजार समिती पुन्हा ताब्यात घेतली. भाजप प्रणीत सर्वपक्षीय पॅनेलला अवघी एक जागा मिळाली. समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक बुधवारी प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटीच्या सभागृहात होणार आहे. निवडणुकीत विजयी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रणीत सहकार आघाडीच्या पॅनेलमध्ये दिग्गज पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याने पक्षाकडून या पदांसाठी कोणाला संधी दिली जाते. याबाबत तालुक्यात मोठी उत्सुकता आहे. महाविकास आघाडी म्हणून काँग्रेसच्या दोन सदस्यांचाही विजयी उमेदवारांमध्ये समावेश असल्याने उपसभापती पदाची संधी त्यातील एकाला मिळणार का याबाबतही मोठी उत्सुकता आहे. दरम्यान, सभापती व उपसभापती पदाचे उमेदवार ठरविण्यासाठी महाविकास आघाडीची २३ तारखेला बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.