शून्य टक्के कर्जाचा पुनर्विचार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शून्य टक्के कर्जाचा पुनर्विचार
शून्य टक्के कर्जाचा पुनर्विचार

शून्य टक्के कर्जाचा पुनर्विचार

sakal_logo
By

वडगाव निंबाळकर, ता. २३ : ‘‘शेतकऱ्यांचे तीन ते पाच लाखापर्यंतचे कर्ज शून्य टक्के व्याजदराने देण्याचा निर्णय पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी घेतला होता. जिल्ह्यात १२०० शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला, पण आता या निर्णयाचा पुनर्विचार करावा लागेल,’’ असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
कोऱ्हाळे बुद्रुक (ता. बारामती) येथे जिल्हा बॅंकेच्या शाखा स्थलांतरण कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची जिल्ह्यातील संख्या २ लाख ४१ हजार आहे. त्यापैकी फक्त १२०० जणांना शून्य टक्के व्याजदराचा फायदा झाला. मूठभर लोकांसाठी ११ कोटी रुपये सर्वांमधून द्यावे लागतात. हे सहकारात कुठे बसत नाही. भावनेच्या भरात घेतलेल्या या निर्णयाचा पुनर्विचार करावा लागणार आहे. शून्य टक्के कर्जाचा लाभ देण्यासाठी राज्यालाही एक हजार कोटी रुपये द्यावे लागतात. त्यात आता केंद्राकडून मिळणारी दोन टक्के रक्कमही आपल्यालाच भरावी लागणार असल्याने तो भुर्दंड वाढणार आहे. या परिस्थितीत ३ ते ५ लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्जाची योजना चालवता येणार नाही.’’

यावेळी जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे, संचालक संभाजी होळकर, दत्तात्रेय येळे, माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, बारामती दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप, सतीश खोमणे, सुनील भगत, प्रदिप धापटे, लालासाहेब माळशिकारे, सरपंच रवींद्र खोमणे आदी यावेळी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, ‘‘साखर कारखान्यांना बॅंक नऊ टक्क्याने कर्ज देते. यंदा राज्यात अजूनही काही कारखाने सुरु आहेत. त्या पार्श्वभूमीवर येत्या हंगामात कारखाने लवकर सुरु करण्यास परवानगी देण्याचा निर्णय राज्य शासन घेईल. यंदा अधिक क्षेत्र असल्याने कारखाने सुरु राहिले. १ मेनंतर गळीताला आलेल्या उसाला २०० रुपये, तर ५० किलोमीटरच्या पुढे वाहतुकीला टनामागे पाच रुपये अनुदान राज्य सरकारने दिले. कांद्याचे दर घसरले आहेत. त्यासाठी ‘नाफेड’च्या माध्यमातून कांदा खरेदी करण्याबाबत मुख्यमंत्र्यांची चर्चा करून केंद्र सरकारकडे परवानगी मागणार आहोत. परवानगी मिळाल्यानंतर चांगल्या दराने कांदा खरेदी करता येईल. वेळ पडल्यास माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचाही सल्ला घेऊ.’’

बॅंकेच्या कर्मचाऱ्यांना सल्ला
‘‘पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत सध्या ८०० जागा रिक्त आहेत. बॅंकेची आर्थिक क्षमता उत्तम असून, लवकरच गुणवत्तेनुसार या जागांची भरती केली जाईल. जिल्हा बॅंकेतील अधिकारी-कर्मचारी शेतकऱ्यांशी उद्धटपणे वागल्याच्या तक्रारी येतात. बाबांनो, तुम्ही पण शेतकऱ्यांची मुले आहात, म्हणून तुम्हाला जिल्हा बॅंकेत नोकरीची संधी दिली आहे. तुम्हाला वर्षातून दोनदा पगारवाढ होत आहे. तसे शेतकऱ्यांचे नाही. त्यामुळे कोणताही व्यक्ति बॅंकेत आला, तरी त्याच्याशी चेअरमनपासून ते शिपायापर्यंत सर्वांनी सौजन्याने वागा,’’ असा सल्ला पवार यांनी दिला.

संचालकांचे कान टोचले
उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते होणारा शाखा उद्‍घाटन बँकेचे अध्यक्ष दुर्गाडे यांच्या हस्ते झाला.
बॅंकेने आवश्यक त्या परवानग्या घेण्यापूर्वीच कार्यक्रमाचे आयोजन केले. अजित पवार यांनी यासंबंधी चौकशी केल्यानंतर काही परवानग्या येणे बाकी असल्याचे त्यांना समजले. त्यामुळे त्यांनी संचालक मंडळाचे कान टोचले. नियमाप्रमाणेच सगळ्या गोष्टी करा. आम्हीच नियम करायचे आणि आम्हीच मोडायचे, हे बरोबर नाही. पुन्हा हे सांगण्याची वेळ येवू देवू नका, या शब्दात त्यांनी सुनावले.

शेतकऱ्यांची मुले परदेशी शिक्षणासाठी जातात. जिल्हा बॅंक त्यांना सध्या २५ लाख रुपये सात टक्के व्याजाने देते. ही मर्यादा वाढवून ४० लाखांवर नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच, व्याजदर कमी करण्याचा प्रयत्न आहे.
- अजित पवार, उपमुख्यमंत्री

Web Title: Todays Latest District Marathi News Vdn22b00780 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top