पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीचा चौथ्या दिवशी सापडला मृतदेह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीचा
चौथ्या दिवशी सापडला मृतदेह
पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीचा चौथ्या दिवशी सापडला मृतदेह

पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीचा चौथ्या दिवशी सापडला मृतदेह

sakal_logo
By

वडगाव निंबाळकर, ता. १६ ः वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथील ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या नरेश मस्कू साळवे (वय ५५) या व्यक्तीचा मृतदेह चौथ्या दिवशी ओढ्यापात्रात सापडला. गुरूवार (ता. १३) दुपारी बाराच्या दरम्यान बुडल्याचा प्रकार घडला होता.

मयत‌ साळवे माळी वस्ती बाजूकडून बाजार तळाकडे निघाले असता ओढ्यावरील छोट्या पुलावरून चालत येताना वेगवान प्रवाहामुळे पाय घसरून ओढापात्रात वाहून गेले होते. दरम्यान, गेले दोन दिवस वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे आणि गावातील तरुण मंडळाच्या मदतीने शोध घेणे सुरू होते, पण यात यश आले नाही.


राष्ट्रवादी आपत्ती व्यवस्थापन सेल, आपत्ती व्यवस्थापन संघाचे पथक शनिवारी (ता. १५) सायंकाळी दाखल झाले, रात्री उशीर झाल्यामुळे पाण्यात शोध घेता आला नाही. सकाळी साडेसातच्या दरम्यान पथकातील संतोष शेलार, करिम सय्यद, सागर जाबरे, संदीप गव्हाणे, नीलेश कुसाळकर, दिलीप गायकवाड, मनोज साळवे यांनी शोध मोहीम सुरू केली असता बुडालेल्या ठिकाणापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर काटेरी झुडपात त्यांना मृतदेह आढळून आला. मृतदेह बाहेर काढून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यानच्या कालावधीत प्रांत अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, पाटबंधारे उपअभियंता प्रवीण घोरपडे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन पाहणी केली होती.

पुराच्या पाण्यात बुडून मृत्युमुखी पडलेल्या नरेश साळवे यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन व्यवस्थापन फंडातून चार लाख रूपये मदत केली जाईल, असे तहसीलदार विजय पाटील यांनी सांगितले.
-----------------------


---------------------------------