
चिथावणीखोर वक्तव्याप्रकरणी ‘सोमेश्वर’च्या संचालकासह १३ जणांवर गुन्हा दाखल
वडगाव निंबाळकर, ता. ११ ः चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी सोमेश्वरनगर (ता. बारामती) येथे शनिवारी (ता.१०) सकाळी निषेध सभा पार पडली. यामध्ये सोमेश्वर कारखान्याचे संचालक ऋषिकेश गायकवाड यांनी चंद्रकांत पाटील
यांना काळे फासणाऱ्या व्यक्तीला ५१ हजारांचे बक्षीस देणार, असे जाहीर केले. याबाबतच्या बातम्या सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्या. चिथावणीखोर वक्तव्य केल्यामुळे पिंपरी-चिंचवड येथे चंद्रकांत पाटील यांच्यावर मनोज गरबडे यांनी शाई फेकली, अशा आशयाची फिर्याद भाजप तालुकाध्यक्ष पाडुरंग मारुती कचरे यांनी पोलिसांकडे दिली. यावरून वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात सोमेश्वरचे संचालक ऋषिकेश गायकवाड यांच्यावर चिथावणी देणारे वक्तव्य केल्याचा आणि शाही टाकणारे मनोज गरबडे यांच्यासह इतर १३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी गायकवाड यांना अटक केली. रविवारी (ता. ११) बारामती न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली, अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी दिली.