
चोपडज दरोड्यातील आरोपी जेरबंद
वडगाव निंबाळकर, ता. ४ : चोपडज (ता. बारामती) येथे नोव्हेंबर महिन्यात शस्त्राचा धाक दाखवून घरातील दागिने रोख रक्कम चोरून नेणाऱ्या चोरट्यांचा शोध लावण्यास स्थानिक गुन्हे शाखा व वडगाव निंबाळकर पोलीसांना यश आले.
संदीपान झुंझून्या भोसले (रा. पिंपळी, ता. बारामती), शरद झुंझून्या भोसले (मूळ रा. पिंपळी; सध्या रा. कासुर्डी, ता. दौंड), अमोल नहाना काळे (रा. पोबलवाडी, ता. करमाळा, जि. सोलापूर), रितेश अर्जुन काळे (रा. कासुर्डी, ता. दौंड), पांड्या ऊर्फ पांडुरंग गोरख ऊर्फ गोऱ्या भोसले (वय २५, मूळ रा. टाकली, ता. करमाळा, जि. सोलापूर, सध्या रा. कासुर्डी, ता. दौंड) यांना ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणला. त्यांच्या तीन साथीदारांचा शोध चालु आहे.
रोख रकमेसह १० लाख ७७ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला होता. त्यापैकी ५० हजार रुपयांचा ऐवज मिळाला आहे. याबाबतचा अधिक तपास आणि उर्वरित आरोपींना ताब्यात घेतल्यावर माहिती पुढे येईल, असे पोलिस सूत्रांनी सांगितले. पाचपेक्षा जास्त आरोपींचा गुन्ह्यात सहभाग असल्याने दरोड्याचे वाढीव कलम लावले आहे. गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आरोपींनी चोरून आणलेली असून, त्याबाबत तपास चालु आहे. आरोपींना ५ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी मिळालेली असून, गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे हे करत आहेत.