
वाहन रचनेत बदल करणाऱ्यांवर कारवाई
वडगाव निंबाळकर, ता. २६ ः वाहन उत्पादक कंपनीने निर्धारित केलेल्या वाहन रचनेत आपण बदल केला असेल तर सावधान...
अशा वाहनांवर कारवाईचे सत्र आता आरटीओने सुरू केले आहे. वाहन रचनेत बदल करून यावर डिजे सिस्टीम लावणाऱ्या वाहनांवर बारामती आरटीओने कारवाई करून ९७ हजाराचा दंड आकारला आहे. खासगी आणि व्यावसायिक नोंदणी असलेल्या वाहनांची रचना उत्पादक कंपनीने तयार केलेली असते त्याप्रमाणे प्रथम पासिंग (नोंदणी) होते. तसा उल्लेख नोंदणी पुस्तकात (आरसी बुक) असतो कालांतराने वाहन मालक सोईनुसार आरटीओच्या परवानगी शिवाय कंपनीने निर्धारित केलेल्या वाहन रचनेत फेरबदल करत आहेत. यामुळे असे वाहन रस्त्याने चालवणे धोकादायक ठरू शकते. बेकायदा फेरबदल केलेल्या वाहनांवर आता आरटीओने कारवाईचे सत्र चालू केले आहे.
पुणे- मुंबई मार्गावर लोणावळा टोल नाक्याजवळ बारामती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर महामार्गावर असलेल्या आरटीओ भरारी पथकाचे कामकाज पाहणी करता गेले असता मध्यरात्रीनंतर डिजे सिस्टीम लावलेले वाहन धोकादायक पद्धतीने रस्त्याच्या कडेने जात असल्याचे आढळून आले. सदर वाहनात मोठ्या प्रमाणात फेरबदल केले होते. सदर वाहनाची कागदपत्रे आणि इन्शुरन्स नव्हता. वाहन रचनेतील बदल हा रस्त्यावरून चालण्यासाठी धोकादायक असल्यामुळे सदर वाहन पोलिस ठाण्यामध्ये लावण्यात आले. शुक्रवार (ता. २४) बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये दंड आकारणी करण्यात आली.
अनेक व्यावसायिक आपल्या सोयीनुसार वाहनांमध्ये बदल करत आहेत. ही बाब वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्यामुळे रस्त्यावर आढळून येणाऱ्या अशा वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे. याबाबतच्या सूचना भरारी पथकांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर यांनी दिली.
आधी प्रबोधन मग कारवाई
यापूर्वी रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त महामार्ग व राज्य मार्गांवर वाहन चालकांमध्ये सुरक्षिततेविषयी जनजागृती करण्यात आली होती. यानंतर आता कारवाई सत्र चालू करण्यात आले आहे. वाहन चालक मालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे
...तर होणार कारवाई
परवानगीशिवाय वाहनाची लांबी रुंदी, उंची वाढवणे.
कंपनी निर्धारित इंधनामध्ये बदल करणे (उदा. पेट्रोल वाहन परवानगीशिवाय गॅसवर करणे)
व्यावसायिक वाहनांवर जाहिराती किंवा मजकूर लिहिणे
परवानगीशिवायआसन क्षमतेत फेरफार करणे
नोंदणीशिवाय वाहन रस्त्यावर चालवणे