होळे येथे थांबले माशांचे मृत्यू
वडगाव निंबाळकर, ता. २७ : होळ (ता. बारामती) येथील नीरा नदीपात्रातील दूषित पाणी पुढे वाहून जाण्यासाठी मुरूम बंधाऱ्यातील शुद्ध पाणी सोडले होते. या सोडलेल्या शुद्ध पाण्यामुळे सध्या तरी नीरा नदीपात्रातील मासे मृत्यूचे प्रमाण थांबले आहे.
मुरूम बंधाऱ्यातील पाणी आमच्या संमतीने सोडले नसल्याचे पाटबंधारे विभागाने सांगितले. महिनाभरापूर्वी मोठ्या प्रमाणात दूषित पाण्यामुळे मासे मृत्यूमुखी पडत होते. होळ बंदाऱ्यालगत चांगले पाणी असल्यामुळे मासे लाखोंच्या संख्येने येत होते. पुढे वरच्या बाजूला असलेल्या मुरूम बंधाऱ्यात मासे जाण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु पाणी कमी झाल्यामुळे त्यांचा प्रवास थांबला. परिणामी लाखो मासे मृत्युमुखी पडले. याबाबत ''सकाळ''मध्ये सचित्र वृत्त प्रसिद्ध झाले होते.
पुढील उपाय योजना म्हणून मुरूम बंधाऱ्यातील पाणी होळ बंधाऱ्यात हळूहळू सोडण्यात आले. दोन्ही बाजूने प्रत्येकी एक ढापे काढल्यामुळे शुद्ध पाणी खाली आले. यामुळे काही प्रमाणात का होईना पण होळ नदीपात्रातील पाण्याचा दूषितपणा कमी झाला आहे. यामुळे पक्षी आणि जलचर यांचा वावर सुरू झाला आहे.
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नुकतीच येथील ढगाई देवी मंदिर परिसरातील सुशोभीकरणाच्या कामाची पाहणी केली यावेळी नदीकाठचा परिसर पाहिला नदीतील पाणी चांगले असल्यामुळे दूषित पाण्यावर काही चर्चा झाले नसल्याची माहिती राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी दिली.
पाण्याचा दूषितपणा सद्या कमी झाला असला तरी याबाबत सातत्य राहावे पुन्हा कारखान्याच्या बाजूने दूषित पाणी येणार नाही याची काळजी घेतली जावी अशी मागणी नदीकाठच्या नागरिकांमधून केली जात आहे.
बंधाऱ्यातील पाणी सोडण्याबाबत कोणतेही आदेश पाटबंधारे विभागाकडून नाहीत. स्थानिक ग्रामस्थांनी ढापे काढले असतील तर पाहणी केली जाईल.
- अनिल नलावडे, सहायक अभियंता, पाटबंधारे विभाग
01866
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.