भटक्या कुत्र्यांचा वावर आवरण्याची मागणी

भटक्या कुत्र्यांचा वावर आवरण्याची मागणी

वडगाव निंबाळकर, ता. १६ ः भटक्या कुत्र्यांचा रस्त्यावरील वावर वाहन चालकांसाठी धोकादायक ठरत आहे. अनेक वेळा शालेय विद्यार्थ्यांवर हल्ले झाले आहेत. कुत्र्यांचा वावर आवरा, अशी मागणी वडगाव निंबाळकर (ता. बारामती) ग्रामपंचायतीकडे निवेदनाद्वारे ग्रामस्थांनी केली आहे.
नीरा-बारामती मार्गावर वडगाव बस स्थानक ते माळी वस्ती परिसरात अनेक ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा वावर आहे. या मार्गावर दोन प्राथमिक शाळा एक माध्यमिक शाळा असल्यामुळे लहान मुलांचा वावर या मार्गावरून होत असतो. रस्त्यालगत मटण आणि चिकन सेंटर आहेत मांसाचे तुकडे रस्त्यावर टाकले जात असल्यामुळे कुत्र्यांचा वावर या परिसरात मोठ्या प्रमाणात आहे. येथील बाजार तळा नजीक ओढ्याच्या पात्रात गावातील चिकन विक्रेते राहिलेल्या मांसाचा भाग पाण्यात टाकून देतात. यामुळे पाण्यातून मांसाचे तुकडे शोधण्यासाठी कुत्र्यांची झुंबड उडते. भटक्या कुत्र्यांचा वाढता वावर रस्त्यासाठी धोकादायक ठरत आहे रस्ता नुकताच रुंदीकरण झाल्यामुळे वाहने सुसाट येतात आणि कुत्र्यांच्या अडथळ्यामुळे अनेक वेळा दुचाकीचे अपघात घडले आहेत. रात्री अपरात्री दुचाकीस्वरांचा पाठलाग कुत्री करत असल्यामुळे वाहन चालवणे धोकादायक ठरू लागले आहे. चिकन आणि मटण विक्रेत्यांनी राहिलेल्या भागाची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावावी. ओढापात्रात मांसाचे तुकडे टाकल्यामुळे पाण्याचे प्रदूषण होते. लगतच सार्वजनिक पाणीपुरवठा विहीर असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मटण चिकन विक्रेत्यांना याबाबत योग्य ती समज देण्यात यावी आणि नागरिकांचे आरोग्य जपण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या जाव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावर दत्तात्रेय गायकवाड, दत्तात्रेय बनकर, किसन ननवरे, विजय हिरवे, गणेश पाटोळे, नितीन शिंदे, रामचंद्र हिरवे, हनुमंत खोमणे, संदीप कदम, अशोक चव्हाण यांच्यासह सुमारे पन्नास ग्रामस्थांनी स्वाक्षऱ्या करून निवेदन दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com