
वडापुरी येथील शेतकऱ्यांना औषधे, चारा बियाणांचे वाटप
वडापुरी, ता. २३ : वडापुरी (ता.इंदापूर) परिसरातील राऊतवस्ती, पंधारवाडी येथे पशुसंवर्धन दिनानिमित्त ''शासन आपल्या दारी'' या अभियानांतर्गत पशुवैद्यकीय दवाखाना वडापुरी यांच्या वतीने वंधत्व निवारण शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी शेतकऱ्यांना औषधे, चारा बी बियाणांचे वाटप करण्यात आले.
शिबिराचे उद्घाटन स्थानिक पशुपालकांच्या हस्ते देशी गायीचे पूजन करून करण्यात आले. शिबिरात १०७ गाई व १६ म्हशी अशा १२३ जनावरांची वंधत्व तपासणी तसेच औषध उपचार करण्यात आले. खनिज मिश्रण, गोचीड नाशक जंतनाशक मेडिसिन गोपालकांना वाटप करण्यात आले. यावेळी पशुवैद्यकीय दवाखाना वडापुरीचे पशुधन पर्यवेक्षक डॉ. तेजस हांगे यांनी पशुपालक बांधवांना उन्हाळ्यात पशुधनाची घ्यायची काळजी व पशुसंवर्धन विषयक सुधारित व्यवस्थापण पद्धती, विभागाच्या योजना व उपक्रम याची माहिती दिली.
शिबिराला डॉ. रोहन ठवरे व परिचर जाधव यांनी सहाय्य केले. शिबिराला तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. रामचंद्र शिंदे व डॉ. श्याम कोळेकर यांचे मार्गदर्शन लाभले.
01826