
‘पुरातत्त्व’च्या आदेशाला केराची टोपली राजरोसपणे शेकडो पर्यटक किल्ल्यांवर मुक्कामी
वेल्हे, ता. २२ : राज्य संरक्षित स्मारकांवर कोणालाही मुक्काम करता येणार नसल्याचे पुरातत्त्व विभागाकडून वेळोवेळी स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र तरीसुद्धा अनेक पर्यटक राजगड व तोरणा या किल्ल्यांवर मुक्कामी राहत असल्याचे दिसून येत आहे. यात काही उपद्रवी पर्यटकांमुळे किल्ल्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र त्यावर नियंत्रण ठेवणारी कोणतीही यंत्रणा पुरातत्त्व खात्याकडे उपलब्ध नाही.
नियमानुसार रात्रीच्यावेळी गड-किल्ल्यांवर मुक्काम करण्यास मनाई आहे. पुरातत्त्व विभागाने तसे स्पष्ट केले असून तसे लेखी निर्देशही दिले आहेत. मात्र त्यास न जुमानता एका दिवसात गड पाहणे शक्य होत नसल्याचे कारण देत किल्ल्यांवर मुक्कामी जाणाऱ्या पर्यटकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामध्ये लहान मुले, महिला यांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चालले आहे. या प्रकारामुळे पर्यटकांचा आणि पर्यायाने गड-किल्ल्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुक्कामी राहणाऱ्या पर्यटकांतील काही उपद्रवी पर्यटकांमुळे किल्ल्यांवरील अवशेषांचे नुकसान होण्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. मागीलवर्षी तोरणा गडावरील तटबंदीच्या संवर्धन कार्याची काही उपद्रवी पर्यटकांमुळे पडझड झाली होती. त्यानंतर पुन्हा किल्ल्यांवर मुक्कामी राहता येणार नसल्याचे निर्देश पुरातत्त्व खात्याकडून देण्यात आले होते. तरीसुद्धा शेकडो पर्यटक या किल्ल्यांवर मुक्कामी असल्याचे दिसून येते.
गडावर जाण्यासाठी अनेक वाटा असल्याने तसेच पुरातत्त्व विभाग आणि वन विभागाकडे मनुष्यबळाची कमतरता असल्याने सरसकट सगळ्या वाटांवर लक्ष ठेवणे कठीण आहे. गडभ्रमंतीसाठी जाणाऱ्या हौशे-नवशे-गवशे यांचे प्रमाण अधिक वाढल्याने गडांवरील अपघात आणि उपद्रव या घटना वाढल्याचे चित्र काही वर्षांत दिसून येत आहे.
रात्रीच्यावेळी गडावर मुक्कामी राहण्यास प्रतिबंध करण्यासाठी स्थानिक नागरिक, वन विभाग व प्रशासनाने पुढे येणे गरजेचे आहे. तसेच पुरातत्त्व विभागाच्या माध्यमातून विकास आराखड्यामध्ये या मुद्द्यासाठी तरतूद होण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात येईल.
-विलास वाहने,
सहायक संचालक, पुरातत्त्व विभाग
पुरातत्त्व विभागाच्या सूचनेनुसार सायंकाळच्यावेळी किल्ल्यावरील पर्यटकांना किल्ल्यावरून खाली जाण्याच्या सूचना दिल्या जातात. परंतु, काही अतिउत्साही पर्यटकांकडून आम्हालाच दमदाटी केली जाते. त्यासाठी किल्ल्यावर पोलिसांची आवश्यकता आहे.
- बापू साबळे, पुरातत्त्व विभाग कर्मचारी, किल्ले राजगड
किल्ले तोरणा व राजगडच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व किल्ले, गटकोटांवर रात्री मुक्कामास बंदी या निर्णयाची कठोर अंमलबजावणी पुरातत्त्व विभागाकडून व्हावी.
- महेश कदम, संस्थापक अध्यक्ष, शिवशंभू प्रतिष्ठान
Web Title: Todays Latest District Marathi News Vel22b00817 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..