
करंजावणे आरोग्य केंद्राबाबत लवकरच बैठक : आरोग्यमंत्री
वेल्हे, ता. ३ : करंजावणे (ता. वेल्हे) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर नसल्याने एका हॉटेल कामगाराचा उपचाराअभावी दुर्दैवी मृत्यू झाला झाला होता. याचे पडसाद अधिवेशनात पडले. यावर आमदार संग्राम थोपटे यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी तेवढ्याच तत्परतेने दखल घेत याबाबत लवकरच बैठक घेऊन समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
करंजावणे प्राथमिक आरोग्य केंद्रात ३ जानेवारी २०२३ रोजी उपचार न मिळाल्याने गणेश महादेव सावंत या कामगाराचा मृत्यू झाला होता. आमदार थोपटे यांनी याबाबत अधिवेशनात आरोग्यमंत्र्यांना घटनेची माहिती दिली. त्यावर आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, आपल्यापर्यंत ही घटना पोचली असून, याबाबत अधिकाऱ्यांना विचारणा करून लवकरच यावर बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावू.
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून भोर, वेल्हे, मुळशी तालुक्यातील आरोग्य केंद्रांचा प्रश्न ऐरणीवर आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी पुरेसे डॉक्टर उपलब्ध नाहीत. त्यामुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. त्यामुळे या ठिकाणी डॉक्टर आणि कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी आमदार थोपटे यांनी केली.