
वेल्ह्यातील खूनप्रकरणी आठ आरोपींना अटक
वेल्हे, ता. ७ : वेल्हे येथे सोमवारी (ता. ६) झालेला नवनाथ ऊर्फ पप्पूशेठ नामदेव रेणुसे (वय ३८) याचा खून जमीन व्यवहारात हस्तक्षेप आणि एक वर्षांपूर्वी मुलाचा झालेल्या मृत्यूला नवनाथ हा जबाबदार असल्याच्या कारणावरून केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली आहे.
माउली ऊर्फ ज्ञानेश्वर लक्ष्मण रेणुसे (वय ५६, रा. पाबे, ता. वेल्हे; सध्या रा. शुक्रवार पेठ, पुणे), आकाश कुमार शेटे, (वय २४), यश ऊर्फ प्रथमेश विनायक चित्ते (वय २२), अक्षय गणेश साळुंखे (वय २७, सर्व रा. शुक्रवार पेठ, पुणे), शुभम राजेश थोरात (वय २१, रा. शुक्रवार पेठ, पुणे, मूळ रा. भालगुडी, ता. मुळशी) यांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांनी माहिती दिली की, वेल्हे तालुक्यातील पाबे येथे राहणारा नवनाथ रेणुसे याचा सोमवारी खून झाला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरारी झाले होते. पोलिसांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, आरोपी माउली रेणुसे हा साथीदारासह किरकटवाडी (ता. हवेली) येथे आल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्यांना सापळा रचून ताब्यात घेतले. माउली रेणुसे याच्या जमिनीच्या व्यवहारात नवनाथ रेणुसे हा हस्तक्षेप करीत होता. तसेच, माऊली रेणुसे याच्या मुलाचा एक वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. त्यास नवनाथ हाच जबाबदार असल्याचा समज त्याच्या मनात होता. त्यावरून त्याचा खून केल्याचे तपासात उघड झाले आहे.
हा गुन्हा करण्यापूर्वी माउली रेणुसे यांनी त्यांची पत्नी कुंदा ज्ञानेश्वर रेणुसे (वय ४५), मुलगी पल्लवी भूषण येनपुरे (वय ३०), मुलगी गौरी अमोल ऊर्फ शशिकांत शिंदे (वय २७) यांच्यासह मिळून सदरचा गुन्हा करण्याचा कट तयार केल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे. सर्व आरोपींना अटक करण्यात आलेले असून, त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले पाटील हे करीत आहेत.