
वेल्हे येथील आगीत घरावरील चारा खाक
वेल्हे, ता. १२ : वेल्हे बुद्रुक येथील पुण्यश्लोक अहिल्यानगर येथे लागलेल्या आगीत जानू धाऊ कचरे यांच्या घराच्या छपरावर जनावरांसाठी ठेवलेला भाताचा पेंढा आणि गवताची गंज जळून खाक झाली. सिमेंट कॉंक्रीटचे छप्पर असल्याने सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र, आगीत जवळपास एक लाख रुपयांचे नुकसान झाले.
अचानक आग लागल्याने गवत, पेंढ्यानी पेट घेतला. आगीने उग्र रूप धारण केले. त्यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी धाव घेतली. कचरे व ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत सर्व गवत चारा व कपडे जळून खाक झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे गोरक्ष भुरूक, विकास गायखे, गणेश निकम, सुरेश शिंदे, संतोष मोरे, सोमनाथ पांगारे आदी कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. महसूल विभागाने नुकसानीचा पंचनामा केला आहे.
गोरक्ष भुरुक यांनी सांगितले की, आग आटोक्यात आणल्याने सुदैवाने कचरे यांच्यासह परिसरातील घरे वाचली. अन्यथा आग आसपास पसरून मोठी हानी झाली असती.