रानडुकराच्या हल्ल्यात रिक्षा कोसळली दरीत

रानडुकराच्या हल्ल्यात रिक्षा कोसळली दरीत

वेल्हे, ता. २५ : पानशेत धरण खोऱ्यातील कादवे खिंडीतून वरघड येथे जात असताना भाविकांच्या रिक्षावर एका उन्मत्त रानडुक्कराने अचानक हल्ला करत जोरदार धडक दिली. रिक्षा वेगाने पलट्या मारत खोल गोपाळ वस्ती दरीत कोसळला. या दुर्घटनेत एक भाविक जागीच ठार झाला, तर त्याचा चुलत पुतण्या गंभीर झाला. रिक्षा चालकासह दोघांना जबर मार लागला आहे. हि घटना शुक्रवारी (ता. २४) पहाटेच्या सुमारास घडली.
भागूजी धावू मरगळे (वय ६०, सध्या रा. नसरापूर, मूळ रा. शिरकोली, ता. वेल्हे), असे मयत भाविकांचे नाव आहे. त्यांचा चुलत पुतण्या पांडुरंग धावू मरगळे (वय ४५, रा. शिरकोली; सध्या रा. डोणजे) हा गंभीर झाला असून, त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी रिक्षा चालक सुरेश कोंडिबा ढेबे (रा. पोळे, ता. वेल्हे) व अशोक बबन मरगळे (वय ३१, रा. शिरकोली), अशी इतर दोन जखमींची नावे आहेत. याबाबत वेल्हे पोलिस ठाण्यात अद्यापही नोंद नसल्याची माहिती सहायक पोलिस फौजदार सुदाम बांदल यांनी दिली.
भागूजी मरगळे व इतर दोघे जण हे सुरेश ढेबे यांच्या रिक्षाने गुरुवारी (ता. २३) मध्यरात्री एक दीड वाजण्याच्या सुमारास पानशेत धरणाजवळील वेल्हे- कादवे खिंडीतील कच्च्या रस्त्याने वरघड येथील जोगाबा देवस्थानकडे चालले होते. उंच डोंगर माथ्यावरील कच्च्या रस्त्याने मंदगतीने रिक्षा चालली होती. त्यावेळी अचानक एक रानडुक्कर धावत आले. काही क्षणात रानडुक्कराने एका रिक्षाला जोरदार धडक दिली. त्यात रिक्षा पलटी होऊन वेगाने खोल दरीत कोसळली. रिक्षा चालक सुरेश ढेबे व अशोक मरगळे हे प्रसंगावधानतेने आडरानात उड्या मारून बाहेर पडले. मात्र, पाठीमागच्या सिटावर बसलेले भागूजी मरगळे व पांडुरंग मरगळे हे रिक्षासह खोल दरीत फेकले गेले. खडक धोंड्यांचा मार लागून भागूजी मरगळे यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच मरगळे यांच्या नातेवाइकांनी वेल्हे पोलीसांना माहिती दिली. वेल्हे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस फौजदार सुदाम बांदल, पोलिस जवान ज्ञानेश्वर शेडगे व वैजनाथ घुंमरे यांनी मध्यरात्री घटनास्थळी धाव घेतली. शिरकोली, कादवे येथील युवक, ग्रामस्थही दाखल झाले.
फौजदार बांदल यांनी तातडीने मणेरवाडी (ता. हवेली) येथील मावळा जवान संघटनेचे गिर्यारोहक रेस्क्यू ऑपरेशन पथकाचे तानाजी भोसले यांच्याशी संपर्क साधला. मध्यरात्री दिड वाजता काळोखात दोर खंडाच्या साह्याने त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. सिंहगड येथील गिर्यारोहक व रेस्क्यू पथकाचे तानाजी भोसले यांनी जिवाची बाजी लावत दुर्गम कातरखडकाच्या अति बिकट खोल दरीत उतरून स्थानिक युवकांच्या मदतीने गंभीर जखमी व मृतदेह बाहेर काढला. दरीत कोसळलेल्या पांडुरंग मरगळे यांना गंभीर जखमी अवस्थेत सुखरूप बाहेर काढण्यात आले. तर, तानाजी भोसले यांनी भागूजी मरगळे यांचा मृतदेह दरीच्या तळातुन खांद्यावर घेऊन कड्याच्या खडकापर्यंत आणला. तेथून स्ट्रेचवर बांधून माथ्यावर मृतदेह आणला.
स्थानिक कार्यकर्ते सुनील मरगळे, नितीन ढेबे, संतोष साळेकर, मारुती मरगळे, सुनील मरगळे, चैतन्य पोळेकर, सुरेश शिर्के, सदाशिव शेळके, अर्जुन शिर्के आदी मदतकार्यात सहभागी झाले होते. १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून जखमींना उपचारासाठी हलविण्यात आले. वेल्हे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मनोज पवार यांच्या देखरेखीखाली वेल्हे पोलिस तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com