
अंथुर्णे परिसरातील आगीत गाईचा मृत्यू, तिघे जखमी
वालचंदनगर, ता. २३ : अंथुर्णे (ता. इंदापूर) येथील सावतामाळी व बोराटेवस्ती येथे विजेच्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत एका गाईचा होरपळून मृत्यू झाला असून, आग आटोक्यात आणताना तीनजण जखमी झाले. अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
सावतामाळी, बोराटेवस्तीलगत शेती महामंडळ जमिनीमध्ये असलेली विद्युत वाहिनीची तार रविवारी (ता. २२) तुटून उसाच्या शेतामध्ये पडल्याने आग लागली. पाण्याअभावी ऊस जळाला होता. वाऱ्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे आग जवळच्या लोकवस्ती पसरली. आगीमुळे शेतकऱ्यांनी घराच्या मागच्या बाजूने नारळ, आंबा, चिकू, सीताफळ, रामफळ, लिंबोणी, चिंच आदी झाडे जळाली. तसेच, घराच्या मागच्या बाजूला लावलेल्या दोन छोट्या कडब्याच्या गंजी या आगीत जळून गेल्या. विठ्ठल लक्ष्मण बोराटे यांच्या घरामागे पत्रा शेडमधील दोन गायींना आगीच्या झळा बसल्या. त्यातील एक गायी सोडण्यात यश आले. तर, दुसऱ्या गाईचा होरपळून मृत्यू झाला. तसेच, पाण्याची टाकी, प्लंबिंग साहित्य, ठिबक सिंचन जळून खाक झाले. अंथुर्णे येथील गाव कामगार तलाठी मिलिंद हगारे व खंडू जाधव यांनी पंचनामा केला.
अंथुर्णे परीसरातील नागरिकांनी प्रसंगावधान राखून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी विठ्ठल बोराटे, विशाल बोराटे व धनाजी बोराटे यांनाही आगीच्या झळा बसल्या. त्यात किरकोळ जखमी झाले आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी वालचंदनगर कंपनीचा व श्री छत्रपती साखर कारखान्याच्या अग्निशामक दलाच्या गाड्या आल्या. त्यामुळे लोकवस्ती आगीपासून बचावल्याने मोठे नुकसान टळले.
Web Title: Todays Latest District Marathi News Wal22b05233 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..