‘छत्रपती’च्या सभासदांचा ‘ग्रुप मेडिक्लेम इन्शुरन्स’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘छत्रपती’च्या सभासदांचा 
‘ग्रुप मेडिक्लेम इन्शुरन्स’
‘छत्रपती’च्या सभासदांचा ‘ग्रुप मेडिक्लेम इन्शुरन्स’

‘छत्रपती’च्या सभासदांचा ‘ग्रुप मेडिक्लेम इन्शुरन्स’

sakal_logo
By

वालचंदनगर, ता. १ : भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने सभासदांच्या कुटुंबाचा ग्रुप मेडिक्लेम इन्शुरन्स करण्याचा व कारखान्याचा गाळप हंगाम सुरु झाल्यानंतर वेळोवेळी उसाची रिकव्हरी (साखरेचा उतारा) तपासणी करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी कारखाना समिती तयार करणार आहे.
भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची ६४ वी वार्षिक साधारण सभा कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. वाढत्या महागाईच्या काळामध्ये रुग्णालयाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला असून, सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याच्या बाहेर जाते. त्यामुळे सभासदांनी कारखान्याच्या माध्यमातून ग्रुप मेडिक्लेम इन्शुरन्स करण्याची मागणी सर्वसाधारण सभेमध्ये केली.
यावेळी संचालक मंडळाने तीन वर्ष कारखान्याला सलग ऊस पुरवठा करणाऱ्या सभासदांच्या कुटुंबाचा ग्रुप मेडिक्लेम इन्शुरन्स करण्यास सहमती दर्शवली. मात्र, सदरचा ग्रुप मेडिक्लेम इन्शुरन्स ऐच्छिक असून, सभासदांच्या उसातून पैसे कपात करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे सभासदांना दिलासा मिळाला असून, सध्या बाजारामध्ये वैयक्तिक मेडिक्लेम इन्शुरन्सच्या तुलनेमध्ये कुटुंबाचा ग्रुप मेडिक्लेम इन्शुरन्स कारखान्याच्या माध्यमातून स्वस्तामध्ये व खात्रीशीर मिळणार आहे.
तसेच, छत्रपती कारखान्याचा साखरेचा उतारा कमी मिळत असून, सभासदांच्या उसाला दर कमी आहेत. यासंदर्भात गाळप हंगाम सुरु झाल्यानंतर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन उसाचे नमुने घेऊन उतारा तपासणी करणार आहे.
यावेळी कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी सांगितले की, साखरेचा उतारा १ टक्का वाढल्यानंतर एका टनाला सुमारे १० किलो साखर वाढत असून, सध्याच्या बाजारभावाप्रमाणे ३५० रुपयांचा फायदा होत असल्याने शेतकऱ्यांनी उतारा जास्त असणाऱ्या उसाच्या जातींची लागवड करण्याची गरज आहे.

खत विक्री व मातीपरीक्षणाची मागणी
यावेळी सभासदांनी सांगितले की, बाजारामध्ये रासायनिक खते घेताना शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्यामुळे कारखान्याने पूर्वीप्रमाणे खत विक्री विभाग सुरु करावा. सभासद रोखीने खते घेऊन जातील. तसेच, शेतकी विभागाच्या माध्यमातून माती परीक्षण विभाग सुरु करून उत्पादन वाढविण्यासाठी मार्गदर्शन करावे, अशी सूचना केली.