आरोप विपर्यास करणारे : काटे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरोप विपर्यास करणारे : काटे
आरोप विपर्यास करणारे : काटे

आरोप विपर्यास करणारे : काटे

sakal_logo
By

वालचंदनगर, ता. १७ : भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने आगाऊ साखर व मळी विक्रीबाबत निर्णय घेतला नसता; तर चालू वर्षीचा गाळप हंगाम सुरु करण्यास अडचण झाली असती. सर्व करता येते, मात्र पैशाचे सोंग आणता येत नाही. त्यावेळच्या प्राप्त परिस्थितीचा विचार करून साखर व मळी विक्रीचा घेतलेला निर्णय योग्यच असून, संचालक मंडळावर केलेले आरोप हे वस्तुस्थितीचा विपर्यास करणारे आहेत,’’ असा खुलासा कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांनी केला.
ते म्हणाले, ‘‘चालू वर्षीचा गळीत हंगाम सुरू करण्यापूर्वी मशिनरी ओव्हरहॉलिंग व मेन्टेन्सची कामे, ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा भरती करणे, केमिकल खरेदी, बारदाना खरेदी, कर्मचाऱ्यांचे पगार व इतर कामासाठी सुमारे ४७ कोटी रुपयांची आवश्यकता होती. त्यासाठी संचालक मंडळाने बँकांकडून रक्कम उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केला व जिल्हा बँकेनेसुद्धा कारखान्यास जेवढी मदत करता येईल, तेवढी मदत केली. परंतु, रिझर्व बॅंकेच्या निर्बंधामुळे बँकेकडून एवढी मोठी रक्कम विनातारण उपलब्ध होऊ शकत नसल्यामुळे संचालक मंडळाने मळी व साखर आगाऊ विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातून आलेली ४७ कोटी रुपयांची रक्कम गेल्या दोन-तीन महिन्यापासून कारखाना सदरची रक्कम बिनव्याजी वापरत आहे. यामध्ये कारखान्याचा फायदाच झाला. सदरची रक्कम बँकेकडून घेतली असती; तर त्याकरिता १२ टक्के व्याज भरावे लागले असते व साखर व मळी विक्रीबाबतचा निर्णय घेतला नसता; तर कारखान्याचा गळीत हंगाम चालू करणे अडचणीचे व जिकरीचे झाले असते. मागील दोन हंगामातही आपण तशा पद्धतीचे निर्णय घेतल्यामुळे आपल्याला गळीत हंगाम सुरु करता आला व उच्चांकी गाळप करता आले. साखर व मळीचे आता बाजारभाव वाढले असून साखर व मळीच्या आगाऊ विक्री केल्यामुळे कारखान्यास तोटा आला, असा आरोप करण्यात आला आहे. शेवटी बाजारपेठेत चढ-उतार होत असतो.’’

‘मागील निर्णय जाचक यांच्या संमतीने’
‘‘पाठीमागील बैठकीला कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक हे संचालक मंडळाचे सभेस उपस्थित राहत होते. त्यावेळीही हंगाम चालू करण्याच्या दृष्टीने कारखान्यास पैशाची आवश्यकता होती व बँकेकडून पैसे उपलब्ध होत नसल्यामुळे जाचक यांच्या संमतीने ही मळीची आगाऊ विक्री करण्याबाबत निर्णय घेण्यात आला,’’ असे काटे यांनी सांगितले.