‘छत्रपती’च्या चौकशीची मागणी करणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘छत्रपती’च्या चौकशीची मागणी करणार
‘छत्रपती’च्या चौकशीची मागणी करणार

‘छत्रपती’च्या चौकशीची मागणी करणार

sakal_logo
By

वालचंदनगर, ता. १९ : भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या कारभाराची कलम ८३ अन्वये चौकशी करण्याची मागणी शेतकरी कृती समितीच्या माध्यमातून मुख्यमंत्री व राज्याच्या सहकार खात्याकडे करणार असून, आगाऊ साखर व मळी विक्रीचा व्यवहार थांबविण्याची विनंती साखर आयुक्तांकडे केली आहे, अशी माहिती कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी दिली.
यासंदर्भात त्यांनी सांगितले की, सन २००३पासून श्री छत्रपती कारखान्यामध्ये राजकीय नाट्य करण्याची स्पर्धाच सुरु आहे. गतवर्षी साडेबारा लाख टन गाळप होऊनही कारखान्यास ऊर्जितावस्था येत नाही. नवीन प्रकल्पाची परतफेड करण्यासाठी आठ-आठ वर्ष लागतात का? चालु वर्षीच्या हंगामामध्ये तोडणी वाहतुकीसाठी ४१ कोटी रुपयांचे वाटप केले आहे. त्याच्याही चौकशीची मागणी करणार आहे.’’

चर्चा करण्याचे आवाहन
‘‘दोन वर्षापूर्वी मी साखर निर्यातीच्या बैठकीला हजर असताना केंद्राचे धोरण जाहीर झाले होते. मात्र, साखर विक्रीच्या धोरणाला विरोध करत असल्यामुळे मला बैठकीमध्ये बसण्यास काही संचालकांनी विरोध केला होता. चालू वर्षी संचालक मंडळाने केंद्राचे धोरण जाहीर झालेले नसताना साखर व मळीची आगाऊ विक्री केली. त्यामुळे सभासदांचा तोटा झाला. मात्र, अध्यक्ष व संचालक मंडळ म्हणत असतील, फायदा झाला आहे; तर फायदा नक्की कोणाचा झाला, सभासदांचा की साखर व मळी विकत घेणाऱ्यांचा? याचा विचार सभासदांनी करावा. कारखान्याच्या कारभाराबाबत खुली जाहीर चर्चा करण्यास माझी तयार असून, अध्यक्षांनी जाहीर चर्चा करावी,’’ असे आव्हान जाचक यांनी दिले.