
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांना अटक
वालचंदनगर, ता. २५ ः बोरी (ता. इंदापूर) येथील विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी चौघा जणांवर गुन्हा दाखल केला असून पती, सासू, सासऱ्याला अटक केली आहे.
याप्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी सागर तुकाराम शिंदे, तुकाराम दशरथ शिंदे, विमल तुकाराम शिंदे (सर्व रा. बोरी), अर्चना परशुराम चांदणे (रा. गोतोंडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यातील सागर शिंदे, तुकाराम शिंदे व विमल शिंदे यांना अटक केली असून न्यायालयाने तीन दिवसाची पोलिस कोठडी दिली. या घटनेमध्ये रेश्मा सागर शिंदे (वय २७) या विवाहित महिलेने औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सागर व रेश्मा यांचा विवाह सात वर्षापूर्वी झाला आहे. तिला पती सागरसह सासू-सासरे व नणंद सतत मानसिक त्रास देत होते. तसेच भांडण ही करत होते. शनिवारी (ता. २४) रेाजी भांडण झाले होते. या त्रासाला कंटाळून तिने शनिवारी विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणाचा तपास वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक विक्रम साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विजय टिळकेकर व प्रमोद भोसले करीत आहेत.