
बोरी येथील द्राक्षांची मलेशिया, थायलंडला गोडी
वालचंदनगर, ता.१४ : बोरी (ता. इंदापूर) परिसरातील द्राक्ष उत्पादनास प्रारंभ झाला असून, शेतकऱ्यांच्या निर्यातक्षम द्राक्षांना ८० ते १५५ रुपये प्रतिकिलो दर मिळू लागला आहे. इंदापूर तालुक्यातून आत्तापर्यंत सुमारे १५० टन द्राक्षांची निर्यात झाली असून, मलेशिया, थायलंड, चीनमधील ग्राहकांना बोरीच्या द्राक्षांची गोडी लागली आहे.
इंदापूर तालुक्यातील बोरी, भरणेवाडी, शेळगाव, कळस, बिरंगुडी परिसरामध्ये सर्वाधिक द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते. तालुक्यामध्ये सुमारे सहा हजार एकर क्षेत्र आहे. बोरी परिसरातील आगाप द्राक्ष घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत. सुमारे एक महिन्यापासून द्राक्षाच्या हंगामास सुरवात झाली आहे. सध्या काळ्या रंगाच्या जंबो द्राक्षाला १३० ते १५५ रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे. तर पिवळसर, पांढऱ्या रंगाच्या द्राक्षाला ८० ते १२० रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे. एक्सपोर्ट करणाऱ्या कंपन्यांच्या माध्यमातून बोरी तसेच तालुक्यातून आत्तापर्यंत १५० मेट्रीक टन द्राक्षांची मलेशिया, थायलंड व चायना निर्यात झाली आहेत. चीनची निर्यात आत्ताच सुरू झाली आहे. चालू वर्ष द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. गेल्या तीन चार-पाच वर्षापासून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागला होता. कोरोनाच्या काळामध्ये बाजारपेठा बंद असल्याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला. तसेच सलग दोन-तीन वर्ष अवकाळी व परतीच्या पावसामुळे जोर धरल्यामुळे द्राक्षउत्पादक शेतकरी अडचणीमध्ये आले होते. चालू वर्षी हंगाम सुरू होण्यापूर्वी अवकाळी पावसाच्या सरी व ढगाळ वातावरणामुळे शेतकरी धास्तावले होते.
---
चालू वर्षी द्राक्षांचे उत्पादन चांगेल मिळेल अशी अपेक्षा आहे. शेतकऱ्यांना दर ही चांगला मिळत आहे.आत्तापर्यंत १५० मेट्रीक टन द्राक्षे निर्यात झाली असून जास्तीजास्त द्राक्ष निर्यात करण्यावर भर असल्याचे सांगितले.
- भारत शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ, पुणे विभाग
हवामानातील बदलचा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसतो. चालु वर्षी इतर वर्षीच्या तुलनेमध्ये हवामान चांगले राहिले. सध्या द्राक्षांचा हंगाम सुरु झाला असून शेतकऱ्यांना एकरी ५ते ७ टन उत्पादन निघत आहे.
- अशोक पाटील, प्रगतशील शेतकरी, माजी उपाध्यक्ष, छत्रपती सहकारी साखर कारखाना
---
02891