
मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोघींचा अपघातात मृत्यू
वालचंदनगर, ता. २२ : जंक्शन (ता. इंदापूर) येथील पोलिस ठाण्याजवळ बारामती-इंदापूर पालखी महामार्गावर मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या दोन महिलांचा अज्ञात वाहनाने धडक देवून चिरडल्याने मृत्यू झाला. अर्चना श्रीशैल सनमठ व अनिता शिवाजी शिंदे (दोघीही रा. आनंदनगर, ता. इंदापूर) यांचा मृत्यू झाला.
वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (ता. २२) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अर्चना सनमठ व अनिता शिंदे या पोलिस ठाण्याजवळून बारामती-इंदापूर राज्यमार्गाच्या सेवारस्त्याने चालत जंक्शन चौकाकडे येत होत्या. पोलिस ठाण्याजवळ इंदापूर बाजूकडून भरधाव मोटारीने या दोघींना धडक दिली. या अपघातामध्ये अर्चना सनमठ यांचा जागीच मृत्यू झाला, तर अनिता शिंदे या जखमी झाल्या होत्या. त्यांना बारामतीमधील खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यायान, अर्चना सनमठ व अनिता शिंदे या दोघी मैत्रीण होत्या. दररोज नियमित सकाळी त्या चालायला जात होत्या. या दोघींच्या मृत्यूमुळे आनंदनगर-जंक्शन परिसरावर शोककळा पसरली.
सध्या बारामती-इंदापूर दरम्यानच्या संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम सुरु आहे. नागरिकांनी पहाटे अगर संध्याकाळी चालण्यासाठी कुठल्याही मुख्य रस्त्याचा वापर करू नये, मुख्य रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ असून, रस्ता हा वाहतुकीसाठी असून, व्यायामासाठी नसतो. व्यायाम, धावणे यासाठी परीसरातील खुल्या मैदानाचा वापर करावा.
- विक्रम साळुंखे, सहायक पोलिस निरीक्षक, वालचंदनगर पोलिस ठाणे
अर्चना सनमठ
अनिता शिंदे