
घरफोडी करणारा चोरटा भवानीनगरमध्ये जेरबंद
वालचंदनगर, ता. ९ : भवानीनगर (ता. इंदापूर) येथील बंद घराचे कडी-कोयंडा तोडून ८१ हजार रुपयांचा ऐवज लंपास करणाऱ्या चोरट्याला वालचंदनगर पोलिसांनी शिताफितीने २४ तासांमध्ये जेरबंद केले. कृष्णाप्पा मुतप्पा बगले (वय ३२, हल्ली रा. भवानीनगर, मूळ रा. सोलापूर), असे त्याचे नाव आहे.
वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भवानीनगर परीसरातील सुवर्णा बाबासाहेब पाटील या बुधवारी (ता. ८) घराला कुलूप लावून बाहेरगावी गेल्या होत्या. दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास कृष्णाप्पा बगले व त्यांच्या साथीदाराने घराचा कडी-कोयंडा उचकटून कपाटातील एकूण ८१ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम, असा ऐवज लंपास केला. याबाबत वालचंदनगर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कौशल्याने गुन्ह्याचा तपास करून २४ तासांमध्ये शिताफितीने कृष्णाप्पा बगले याला जेरबंद केले. पोलिसांनी दुसऱ्या चोरट्याच्या शोधासाठी पथके पाठवली आहेत. सहायक पोलिस निरीक्षक विक्रम साळुंखे, पोलिस उपनिरीक्षक अतुल खंदारे, सहायक फौजदार शरद तावरे, हवालदार मोहिते, विनोद पवार, किसन बेलदार यांनी आरोपीला जेरबंद केले.