कालवा फुटीचे पंचनामे रखडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कालवा फुटीचे पंचनामे रखडले
कालवा फुटीचे पंचनामे रखडले

कालवा फुटीचे पंचनामे रखडले

sakal_logo
By

वालचंदनगर, ता. १४ : सणसर (ता. इंदापूर) येथील रायतेमळा येथे सोमवारी (ता. १३) रात्री नीरा डाव्या कालव्याच्या मोरीला भगदाड पडल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. ते शेतकऱ्यांच्या शेतामधून वाहिल्यामुळे पिकांचे नुकसान झाले असून, घरामध्येही पाणी घुसले. सुमारे ५० हेक्टर क्षेत्रामधील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पंचनामे झाले नाहीत. शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
रायतेमळा येथील नीरा डाव्या कालव्याला सोमवारी (ता. १३) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास भगदाड पडले. नीरा डावा कालव्यातून उन्हाळी आवर्तन सुरु होते. सणसरजवळ कालव्यातून ३५० क्यूसेकने पाणी वाहत होते. अचानक कालव्याला भगदाड पडल्यामुळे वेगाने पाणी वाहू लागले. मंगळवारी रात्रीपर्यंत कालव्यातून पाणी वाहत होते. पाण्याच्या वेगामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले. काढणीस आलेला गहू, हरभरा, मका, ऊस पिकामध्ये पाणी वेगाने घुसले. काढणीस आलेला गव्हामध्ये पाणी गेल्यामुळे शेतकऱ्यांना उशिरा गव्हाची काढणी करावी लागणार आहे. तसेच, वेगाने पाणी घुसल्यामुळे मका पिकाचे नुकसान होणार आहे. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खचल्या असून, शेतामधील माती वाहून गेली.
बाळासाहेब नेवसे, विजय निंबाळकर, पांडुरंग बारवकर, बाळकृष्ण भालेकर, हेमंत निंबाळकर, धनंजय भाग्यवंत, हनुमंत खटके यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. नेताजी भातखंडे, बबन निंबाळकर यांच्या घरामध्ये पाणी गेले. सुमारे ५० हेक्टर क्षेत्रामधील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
यासंदर्भात सणसर मधील शेतकरी हेमंत निंबाळकर यांनी सांगितले की, पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे कालवा फुटला आहे. शेतकऱ्यांच्या शेतामधून पाणी वाहिल्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून, शासानाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.
शिवसेनेचे तालुकाप्रमुख महारुद्र पाटील, आमदार दत्तात्रेय भरणे यांचे चिरंजीव श्रीराज भरणे, भाजपचे तानाजी थोरात यांच्यासह अनेकांना नुकसानाची पाहणी केली.

धरणाचा दरवाजा उघडल्यानंतर जसा पाण्याचा आवाज येत होता, तसा पाण्याचा आवाज रात्री आठ वाजण्याच्या सुमारास येण्यास सुरवात झाली. पाण्याच्या आवाजामुळे आम्ही घाबरलो होतो. आमच्या बाजूच्या घरामध्ये पाणी घुसले. घराबाहेर ठेवलेली रासायनिक खताच्या पिशव्याही पाण्यामध्ये वाहून गेल्या आहेत. ऊस व मका पिकामध्ये पाणी घुसल्यामुळे नुकसान झाले.
- सुदेश निंबाळकर, शेतकरी, सणसर (ता. इंदापूर)