ऐकलंत का? आख्खी इमारतच मागे सरकवणार

ऐकलंत का? आख्खी इमारतच मागे सरकवणार

राजकुमार थोरात : सकाळ वृत्तसेवा
वालचंदनगर, ता. २५ : काटेवाडी (ता. इंदापूर) येथील मुलाणी कुटुंबाने वडिलांच्या स्मृती जपण्यासाठी संत तुकाराम महाराज पालखी महामार्गालगतची रस्त्यामध्ये येणारी दोन मजली इमारत मूळ जागेपासून जॅक व चॅनेलच्या साहाय्याने ९ फूट मागे सरकविण्याच्या कामास सुरवात केली आहे. इमारत मूळ जागेपासून सुमारे ५ फूट उंच उचलण्यात येणार आहे.
बारामती व इंदापूर तालुक्यामध्ये संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम वेगाने सुरु आहे. महामार्गामधील जमिनीचे अधिग्रहण झाले असून, रस्त्यामध्ये येणाऱ्या इमारती पाडण्यात आल्या आहेत. इमारतीची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिली आहे. काटेवाडी गावामध्ये पालखी महामार्गाचे काम वेगाने सुरु आहे.
काटेवाडी गावाजवळील मुलाणी कुटुंबाने प्रतिकूल आर्थिक परिस्थितीत कमर्शिअल कॉम्प्लेक्सची दुमजली इमारत रस्त्यालगत उभी केली होती. इमारत उभे करणारे दादासाहब मुलाणी यांचे चार वर्षांपूर्वी निधन झाले होते. पालखी महामार्गामुळे रस्त्याचे रुंदीकरण झाले असल्यामुळे इमारतीचा सुमारे ९ फूट भाग रस्त्यामध्ये गेला. त्यामुळे मुलाणी कुटुंबाला इमारत पाडवी लागणार होती. मात्र, त्यांनी वडिलांच्या स्मृती इमारतीच्या माध्यमातून कायमस्वरूपी जपण्यासाठी इमारतच पाठीमागे सरकविण्याचा निर्णय घेतला.
अकबर मुलाणी व हसन मुलाणी या बंधूनी याचे काम पानिपतमधीन एका ठेकेदाराला दिले असून, प्रत्यक्षात काम सुरु झाले आहे. आतापर्यंत मूळ जागेपासून सुमारे ३ फूट इंच इमारत वरती घेतली असून, ५ फूट इमारत उचलून ९ फूट मागे सरकविण्यात येणार आहे.
अशा प्रकारे हरियानामध्ये हजारो इमारती सरकवल्या असल्याचे ठेकेदार मोहन लाल यांनी सांगितले. या परिसरामध्ये पहिलाच प्रयोग असल्याने नागरिकांमध्ये इमारत कशी मागे सरकवतात, याची उत्सुकता आहे.

आमची तीन हजार चौरस फुटाची दोन मजली इमारत पालखी महामार्गाच्या रुंदीकरणामध्ये ९ फूट जात होती. इमारत पाडून नव्याने बांधणे खर्चिक आहे. तसेच, इमारतीमध्ये वडिलांच्या आठवणी असल्यामुळे आम्ही इमारत पाठीमागे सरकविण्याचा निर्णय घेतला. इमारत सरकविण्यासाठी १५ लाख मजुरी देण्यात आली असून, त्यासाठीचे साहित्य आम्ही पुरविणार आहोत. नवीन इमारतीच्या तुलनेमध्ये हा खर्च कमी आहे.
- हसन मुलाणी, काटेवाडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com