नीरा नदीवरील बंधारे शेतकऱ्यांसाठी वरदान

नीरा नदीवरील बंधारे शेतकऱ्यांसाठी वरदान

वालचंदनगर, ता. ८ : एैन उन्हाळ्यामध्ये नीरा नदी इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना फायदेशीर ठरली. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये नीरा नदीवरील बंधाऱ्यांत मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. यामुळे इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना हे बंधारे वरदान ठरत आहेत. नदीकाठच्या शेतकऱ्यांची पिके नदीच्या पाण्यामुळे हिरवीगार असून, दिमाखात डौलत आहेत.

पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांच्या योग्य नियोजन व शेतकऱ्यांच्या मदतीमुळे चालू वर्षीच्या उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांसाठी भरपूर पाणी उपलब्ध झाले आहे. इंदापूर तालुक्यामध्ये नीरा नदीवर तावशी, जांब, कुरवली, चिखली, वालचंदनगर, निमसाखर निरवांगी, खोरोची, बोराटवाडी, चाकाटी, पिठेवाडी, सराटी वरती कोल्हापूरी पद्धतीचे बंधारे आहेत. पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांच्या मदतीने बंधाऱ्यातील पाणी गळती रोखल्याने चाकाटी, पिठेवाडी, सराटी वगळता उर्वरित बंधाऱ्यामध्ये मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये बंधाऱ्यामध्ये ४० टक्के पेक्षा जास्त पाणी राहिले. यापूर्वी एप्रिलमध्ये बंधाऱ्यातील पाणी आटल्यामुळे ऐन उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाई निर्माण झाली होती.पाण्याअभावी हाततोंडाशी आलेली पिके जळून खाक होत होती. मात्र, चालू वर्षी नीरा नदी काठी चित्र वेगळे आहे. मात्र, अधिकाऱ्यांच्या नियोजनामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तसेच मका व कडवळ हे चारा पिकांना पाणी मिळाल्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न मार्गी लागला आहे.
---
पाणी गळती कमी करण्यामध्ये यश
बारामती विभागाचे पाटबंधारे विभागाचे अधिकारी अश्‍विन पवार यांनी सांगितले की, चालू वर्षी बंधाऱ्यातील पाणी गळती कमी करण्यामध्ये यश आले असून नीरा नदीवरती काही बंधारे वगळता बहुतांश बंधाऱ्यामध्ये ४० टक्के पेक्षा जास्त पाणी आहे.
---
मे महिन्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात नीरा नदीवरील बंधाऱ्यांमध्ये पाणी राहत नव्हते. या वर्षी बंधाऱ्यामध्ये भरपूर पाणी आहे. याचा फायदा नदीकाठच्या शेतकऱ्यांना होत आहे. तसेच शेतकऱ्यांनी पाइप-लाइनद्वारे पाणी शेतामध्ये आणल्यामुळे नदीच्या पाण्यामुळे पिके हिरवीगार आहेत.
-हर्षल रणवरे, शेतकरी, निमसाखर


03153

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com