छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीचे बिगूल वाजले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

छत्रपती कारखान्याच्या 
निवडणुकीचे बिगूल वाजले
छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीचे बिगूल वाजले

छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीचे बिगूल वाजले

sakal_logo
By

वालचंदनगर, ता. १२ : भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या सन २०२३-२०२८ च्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्राथमिक मतदार यादी तयार करण्याचा आदेश पुण्याच्या प्रादेशिक सहसंचालकांनी दिला असून, गेल्या तीन वर्षांपासून लांबलेल्या या निवडणुकीचे बिगूल वाजले आहे.
भवानीनगरमधील श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना इंदापूर तालुक्याच्या राजकारणावर परिणाम करीत असतो. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी कारखान्याची निवडणूक महत्त्वाची असते. कारखान्याच्या संचालकपदासाठी अनेकजण प्रयत्नशील असतात. श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्‍याच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत १० मे २०२० रोजी संपली होती. त्यावेळी निवडणूक याद्या सादर करून प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाकडे पाठविल्या होत्या. मात्र, त्या याद्यावर हरकती घेऊन उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केल्या. त्यामुळे गेल्या तीन वर्षापासून कारखान्याची निवडणूक रखडली होती.
दरम्यान, २१ एप्रिल २०२३ रोजी उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढून निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचा आदेश दिला. यासंदर्भात १० मे २०२३ रोजी प्रादेशिक सहसंचालकाने छत्रपती कारखान्याने प्राथमिक मतदार याद्या तयार करण्याचा आदेश दिला. सदरच्या याद्या तयार करताना १ मे २०२३ ची सभासद संख्या विचार घेण्यात येणार आहे. तसेच, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम २६ व २७ मध्ये दिनांक २८ मार्च २०२२ मध्ये झालेली सुधारणा तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१, महाराष्ट्र सहकारी संस्था (समिती निवडणूक) २०१४ च्या उपविधीतील तरतुदीचे पालन करण्याची सूचना केली आहे.