आषाढी वारी : चिमुकल्या वारकऱ्यांचे सर्वांना आकर्षण वाल्ह्यात बालचमूंचा पालखी सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आषाढी वारी : चिमुकल्या वारकऱ्यांचे सर्वांना आकर्षण
वाल्ह्यात बालचमूंचा पालखी सोहळा
आषाढी वारी : चिमुकल्या वारकऱ्यांचे सर्वांना आकर्षण वाल्ह्यात बालचमूंचा पालखी सोहळा

आषाढी वारी : चिमुकल्या वारकऱ्यांचे सर्वांना आकर्षण वाल्ह्यात बालचमूंचा पालखी सोहळा

sakal_logo
By

वाल्हे, ता. २६ : ‘विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी दुमदुमली पंढरी’चा जयघोष करत आज वाल्हे (ता. पुरंदर) येथील रयत शिक्षण संस्थेच्या महर्षी वाल्मिकी विद्यालयाच्या प्रांगणात एका अनोख्या दिंडीचे आगमन झाले. ही दिंडी होती महर्षी वाल्मिकी विद्यालयातील विद्यार्थ्यांची. आषाढी वारीनिमित्त या दिंडीचे आयोजन केले होते.

सजवलेल्या अश्वासह वारकऱ्यांच्या वेशातील विद्यार्थी व डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या विद्यार्थिनींसह केलेला पालखी सोहळा भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. तसेच पालखीतील रिंगण सोहळ्याने उपस्थितांना पंढरीचे दर्शन घडविले.

पंढरीच्या पांडुरंगाला भेटण्याची आस पायी जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबरच शाळांमध्ये शिकत असलेल्या बालचमूंनाही लागली आहे. प्रत्यक्ष वारीत सहभागी होता येत नसले तरी, वारीचा अनुभव मात्र मुलांना घेता यावा, यासाठी वाल्हे (ता. पुरंदर) येथील महर्षी वाल्मीकी विद्यालयामध्ये पालखी सोहळ्याचे आयोजन केले होते. प्राचार्य अब्दुल गफार खान पठाण व पर्यवेक्षक बाबासाहेब कुंभार यांनी पालखीचे पूजन केल्यानंतर या पालखी सोहळ्याद्वारे विठ्ठलनामाच्या गजरासह विद्यालयामध्ये प्रभात फेरी काढण्यात आली.

टाळ-मृदुंगाच्या गजरात विद्यार्थ्यांसह शिक्षक, पालकही तल्लीन झाल्याने पंढरीच्या विठुरायाला भेटण्याची आस थोरांसह चिमुकल्यांनाही लागली होती. पालखी मिरवणुकीनंतर विद्यालयाच्या वतीने पालखीचे स्वागत, आरतीनंतर अश्वरिंगणास सुरुवात झाली होती. बालवारकऱ्यांनी पालखी सोहळ्यासह दिंडीमधील घोड्याच्या रिंगण सोहळ्यात विविध खेळ, शिक्षिकांसह विद्यार्थिनींनी फेर, फुगडी खेळत एक वेगळाच रंग भरला. या सोहळ्यासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर कुदळे, अशोक महाराज पवार व गौरव गायकवाड यांनी सहकार्य केले.

चिमुकल्या वारकऱ्यांचे आकर्षण
या वेळी विठ्ठल-रखुमाई, संत ज्ञानेश्वरांसह वारकऱ्यांच्या वेशभूषा विद्यार्थ्यांनी साकारल्या होत्या. या दिंडीला पारंपरिक वारीचे स्वरूप यावे यासाठी दिंडीमध्ये सर्वात पुढे सजविलेला अश्व, पाठीमागे वारकऱ्यांचा वेष परिधान केलेले विद्यार्थी, नऊवारी साड्या नेसून डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या विद्यार्थिनी, पाना-फुलांनी सजविलेल्या पालखीच्या पुढे-मागे भगव्या पताका, गळ्यात टाळ, कपाळी गंध, भजनात दंग झालेले चिमुकले वारकरी सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले होते.

Web Title: Todays Latest District Marathi News Whl22b00095 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top