परतीच्या मॉन्सूनमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी! अंजीर बागांवर या २ रोगांचा प्रादुर्भाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anjir
अंजीर बागांवर तांबेरा, करप्याचा प्रादुर्भाव

परतीच्या मॉन्सूनमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी! अंजीर बागांवर या २ रोगांचा प्रादुर्भाव

वाल्हे : आडाचीवाडी (ता.पुरंदर) येथे अंजीर बागांवर परतीचा मॉन्सून, कडाक्याची थंडी तसेच ढगाळलेले वातावरणामुळे करपा, तांबेरा आदी रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे फळ पिवळे पडून गळू लागले आहे. लहरी हवामानामुळे अंजीर जागेवर उकलू लागल्यामुळे उत्पादक शेतकरी हैराण झाले आहेत.

आडाचीवाडी परिसरातील शेतकऱ्यांचे अंजीर हे प्रमुख पीक आहे. परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर अंजिराच्या फळबागा आहेत. हमखास

उत्पन्न मिळवून देणारे हे पीक असल्याने याचे उत्पादन चांगल्या पद्धतीने घेतले जाते. सध्या खट्टा बहार आहे. दररोजचा पाऊस व बदलत्या हवामानाचा परिणाम अंजिराच्या बाजारपेठेवर झाला आहे. हजारो रुपये खर्च करुन देखील प्रमाणात आर्थिक उत्पन्न येत नसल्याने शेतकरी वर्गात असमाधानकारक वातावरण असल्याचे सूर्यकांत पवार, मंगेश पवार, आनंद पवार आदी उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले.

पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांना यंदा हवामानाच्या लहरीपणाचा चांगलाच फटका बसला आहे. परतीचा मॉन्सून, कडाक्याची थंडी, ढगाळलेले वातावरण अंजीर बागांना हानिकारक ठरत असून हवेमध्ये आद्रतेचे प्रमाण वाढत असल्याने फळे उकलू लागली आहेत. थंडीमुळे फळाचे आकारमान व कलर येत नसल्यामुळे त्याचा परिणाम बाजारपेठेवर होते आहे.

उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या
अंजिराच्या उत्पन्नामध्ये जवळपास पन्नास ते साठ टक्क्यांपेक्षा अधिक घट होत असून अंजीर उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. बागांवर झालेला खर्चदेखील निघेनासा झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडून शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान होत असल्याचे अंजीर उत्पादक संभाजी पवार, प्रशांत पवार यांनी ''सकाळ''शी बोलताना सांगितले.