बिबट्याला पाहून पिंगोरीकरांची भंबेरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बिबट्याला पाहून पिंगोरीकरांची भंबेरी
बिबट्याला पाहून पिंगोरीकरांची भंबेरी

बिबट्याला पाहून पिंगोरीकरांची भंबेरी

sakal_logo
By

वाल्हे, ता. ११ : पिंगोरी (ता. पुरंदर) परिसरात गेल्या आठवडाभरात तीन ठिकाणी बिबट्या दिसला. त्यात गुरुवारी (ता. १०) सायंकाळी दगडावर दबा धरून बसलेला बिबट्या पाहून पिंगोरीकरांची भंबेरी उडाली होती. पुरंदर तालुक्यातील पिंगोरी व वाल्हे परिसरामध्ये कायमच वन्य श्वापदांचा वावर दिसून आला आहे. या ठिकाणी कधी लांडगे, कोल्हे; तर कधी बिबट्याचेही दर्शन घडले आहे. मात्र, गेल्या महिनाभरापासून पिंगोरी, वाल्हे, वागदरवाडी परिसरातील मोरूजीचीवाडी, बहिर्जीचीवाडी, बाळाचीजीवाडी या ठिकाणाहून
बिबट्या दिसल्याच्या वावड्या उठत होत्या. मात्र, त्याला ठोस असा पुरावा मिळत नव्हता. अखेर गेल्या आठ दिवसांपुसन भीतीच्या सावटाखाली असलेल्या पिंगोरीकरांना गुरुवारी बिबट्याने आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत एका शेळीचा फडशा पाडला.
पिंगोरी येथील सोमनाथ सर्जेराव शिंदे हे गुरुवारी सायंकाळी दिल्लेदरा येथील टेकडीवर चरावयास सोडलेल्या आपल्या जनावरांना आणण्यासाठी गेले असता टेकडीच्या खालून त्यांना त्यांची शेळ्यांसह जनावरे इकडे-तिकडे पळताना दिसली. शेळीच्या हालचालीने ते क्षणभर हबकले. तेव्हा बिबट्याने हल्ला करत एक शेळी डोंगरावरील झाडांमध्ये ओढून नेली. दगडावर बिबट्या हल्ला करण्याच्या तयारीत बसलेला त्यांनी पाहिला असता प्रथमदर्शनी सर्वांची भंबेरी उडाली. शिंदे यांनी जोरात आरडाओरडा केल्याने बिबट्याने शेजारील टेकडीवर धूम ठोकून पसार झाल्याने त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
दरम्यान, शुक्रवारी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पिंगोरी परिसरामध्ये बिबट्याचा वावर वाढल्याने भीतीचे वातावरण आहे. वन विभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.