
आडाचीवाडीमध्ये मंदिरावर आकर्षक फुलांची सजावट
वाल्हे, ता. ७ : आडाचीवाडी (ता. पुरंदर) येथील दत्तमंदिरामध्ये श्रीदत्त जयंतीचे औचित्य साधत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मंदिरामध्ये आकर्षक फुलांची, पताकांची सजावट करुन विद्युत रोषणाई करण्यात आली होती. ''दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा''च्या जयघोषात भाविकांनी फुलांची उधळण करीत दत्तजन्माचा सोहळा पार पडला.
आडाचीवाडी येथे पुरंदर पंचायत समितीचे माजी सदस्य शिवाजीराव पवार यांनी उभारलेल्या दत्त मंदिरामध्ये या वर्षी तेविसावा दत्तजयंती सोहळा पार पडला. या निमित्ताने तीन दिवसीय अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. अखंड हरिनाम सप्ताहाचे कलशपूजन माजी सभापती गिरीश पवार, वीणापूजन सरपंच दत्तात्रेय पवार, उपसरपंच हनुमंत पवार यांच्या हस्ते करण्यात आले. सप्ताहाचे व्यासपीठ नेतृत्व सुकलवाडी येथील
अशोकमहाराज पवार यांनी केले.
महर्षी वाल्मीकी वारकरी सेवा संघाचे संस्थापक हभप अशोकमहाराज पवार यांच्या सुश्राव्य किर्तनासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, तर सायंकाळी सप्ताहाच्या
समाप्तीनिमित्त पुणे येथील भागवताचार्य हभप संतोषमहाराज पायगुडे यांचे काल्याचे कीर्तन झाले.
याप्रसंगी माजी सभापती अतुल म्हस्के, विठ्ठल जाधव, प्रशांत पवार, शंकर पवार, भाऊसाहेब पवार, नामदेव पवार, माणिक पवार, गणपत खुटवड, अलका पवार, मंदाकिनी पवार आदी उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
माजी जिल्हा परिषद सदस्या शालिनी पवार, अथर्व पवार यांच्या वतीने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
...-------------------