
आडाचीवाडी येथे लोकसहभागातून साकारतेय नाना-नानी पार्क
वाल्हे, ता. २८ : आडाचीवाडी (ता. पुरंदर) येथे ग्रामपंचायतीच्या वतीने लोकसहभागातून नाना-नानी पार्क साकारण्यात येत आहे. सध्या पार्कचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. नाना-नानी पार्कचा लहान मुलांबरोबरच ज्येष्ठांनाही विरंगुळ्यासाठी उपयोग होणार आहे.
ग्रामस्थ व मावळ- मुळशीचे प्रांताधिकारी संदेश शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पार्क तयार करण्यात येत आहे. स्मशानभूमीलगत जवळपास 40 गुंठे जागेत नाना-नानी पार्क विकसित करण्यात येणार आहे.
पार्कची कायमस्वरूपी काळजी ग्रामपंचायत घेणार असल्याचे सरपंच दत्तात्रेय पवार यांनी सांगितले. नाना-नानी पार्कची रचना सुयोग्य असून त्यासाठी प्रातांधिकारी संदेश शिर्के यांसह उद्योजक विक्रम पवार, पोपट पवार, शंकर पवार, मोहन पवार, सूर्यकांत पवार, हनुमंत पवार, विकास पवार, अविनाश चव्हाण, विनय पवार आदि ग्रामस्थांसह पुण्यातील फ्लोअरमार्ट अॅग्रीटेक इंडिया कंपनीकडून विविध प्रकारची सुशोभीकरणासाठी जवळपास नऊ हजार झाडे देण्यात आली. या पार्कमुळे लहान मुलांच्या खेळण्याची तसेच ज्येष्ठांसाठी विरंगुळ्याची चांगली सोय होणार आहे. परिसरातील शाळांतील मुले याठिकाणी सहलीचा आनंदही घेतील, असा विश्वास माजी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी
व्यक्त केला.
विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केल्यास विकास साध्य होऊ शकतो. भविष्यातही अशाच पद्धतीने सर्वांचे सहकार्य राहिल्यास परिसरात
विविध योजना राबविण्याची ग्वाही आडाचीवाडीचे रहिवासी व मावळ-मुळशीचे प्रांताधिकारी संदेश शिर्के यांनी दिली.