वन्य प्राण्यांसाठी नवदापत्यांकडून टँकरची सोय

वन्य प्राण्यांसाठी नवदापत्यांकडून टँकरची सोय

वाल्हे, ता. १० : सध्या लग्न सराईचा महिना सुरू आहे. अनेकजण लग्न मोठ्या थाटात करतात. पण, याला सासवड येथील लग्नसोहळा अपवाद ठरला आहे. शुक्रवार (ता.१२) रोजी सासवड (ता. पुरंदर) येथील विपुल शिरीष गिरमे व बारामती येथील रेणुका मनोज बोरावके यांचा विवाह सोहळा पार पडला. त्यांनी विवाह सोहळ्याच्या खर्चातून वन्यप्राण्यांसाठी वनविभागाने बांधलेल्या विविध ठिकाणच्या पाणवठ्यामध्ये पाण्याचे टँकर दिले. त्यामुळे त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

उन्हाची दाहकता वाढत असल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधात मानवी वस्त्यांजवळ येत आहेत. यातून बऱ्याचदा त्यांचा माणसाशी संघर्ष होतो.
या संघर्षात प्राण्यांसोबतच मनुष्यालाही इजा पोहचते. कधी-कधी रस्ता ओलांडताना अपघात होतात. हे टाळण्यासाठी शेतकरी कुटुंबातील नवदांपत्याने एक अभिनव उपक्रम राबवत, बारामती वनविभागातील वन्यप्राण्यांसाठी पाण्याचा टँकर उपलब्ध करून देत वन्यजीवांची तहान भागविण्याचा प्रयत्न केला आहे.

गेल्या काही दिवसांत उन्हाची काहिली वाढली असून माणसांबरोबरच प्राण्यांच्या जिवाची काहिली झाली आहे.पाण्यासाठी वन्यप्राणी इकडे-तिकडे
भटकत असताना बऱ्याचदा अपघात होऊन त्यांच्या जिवावर बेतण्याचे प्रकार घडत आहेत. प्राण्यांचे, असे मृत्यू रोखण्यासाठी सासवड येथील विपुल शिरीष गिरमे व बारामती येथील रेणुका मनोज बोरावके या नवदांपत्याने आकस्मिक एक निर्णय घेतला, आपल्या कुटुंबीयांसमोर मांडला. वन्यजीवांसाठी घेतलेल्या या अभिनव उपक्रमास शेतकरी परिवारातील असलेल्या गिरमे व बोरावके या दोन्ही कुटुंबीयांनी प्रतिसाद देत नव-वधुवरांच्या या निर्णयाला होकार दिला.

शुक्रवार (ता.१२) नववधुवरांच्या डोक्यावर अक्षदा पडल्यानंतर हे दांपत्य आपल्या कुटुंबीयांसह बारामती वनविभागातील या ठिकाणी जाऊन
वन्यप्राण्यांसाठी वनविभागाने तयार केलेल्या पाणवठ्यांवर टँकरद्वारे पाणी सोडले. यावेळी सुरेश गिरमे, शिरीष गिरमे, गिरीश गिरमे, सुधीर गिरमे, ग्रामपंचायत सदस्य संतोष चौधरी, गणेश चौधरी, किशोर कुदळे, मुकुल गिरमे आदी उपस्थित होते. दरम्यान, नवदांपत्याच्या या उपक्रमांचे वनपाल अमोल पाचपुते यांनी कौतुक केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com