
हरणी येथे चोरट्यांचा धुमाकूळ
वाल्हे, ता. १ : हरणी (ता. पुरंदर) येथील गंगाबाईचा माळ परिसरात बुधवारी (ता. ३१) रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालून दोन ठिकाणी घरफोडी करत रोख रकमेसह लाखो रुपयांचा ऐवज चोरला. मध्ये घटना घडली.
गंगाबाईचा माळ येथे बुधवारी रात्री दीड वाजता विजय यादव यांच्या शेतातील राहतेवजा बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरामधील कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त टाकून सुमारे पंचवीस हजार रुपयांची रोख रक्कम पळवली. तर, शेजारील दत्तात्रेय उत्तम यादव हे घरामध्ये कुटुंबासह सर्वजण गाढ झोपलेले असताना चोरट्यांनी प्रवेश करून यादव यांच्या पत्नीला मारहाण करून त्यांच्या अंगावरील जवळपास दोन तोळे सोने चोरट्यांनी अक्षरक्ष: ओरबाडून नेले. तसेच, घरातील कपाटातील साहित्य व भांडी घरात इतरत्र फेकून नासधूस केली. चोरीच्या वेळी चोरट्यांनी धारदार शस्त्रांचा वापर केल्याने चोरीवेळी कोणी काही बोलले नाही.
चोरट्यांनी घातलेल्या धुमाकुळामुळे दहशतीखाली असलेल्या यादव कुटुंबीयांनी चोरटे घराबाहेर पडल्यानंतर आरडाओरडा केला. त्यानंतर शेजारील तरुण जागे झाले. त्यांनी चोरट्यांचा पाठलाग केला. सिनेस्टाईलने रात्री हा खेळ सुरू होता. तरूणांनी जवळपास अर्धा किलोमीटर अंतरापर्यंत या
चोरट्यांचा पळत पाठलाग केला. मात्र, रात्री अंधाराचा गैरफायदा घेत चोरटे हरणी-वाल्हे रस्त्यालगत अंधारामध्ये गायब झाले. चोरट्यांनी चोरी केल्याच्या ठिकाणापासून जवळपास अर्धा किलोमीटर हरणी वाल्हे रस्त्यालगत दुचाकी लावून ठेवल्या होत्या. याबाबत हरणीतील तरुणांना माहिती झाल्यानंतर मोठ्या शिताफीने तरूणांनी दुचाकीवर या चोरट्यांचा पिंपरे खुर्दपर्यंत पाठलाग केला. चोरट्यांनी हरणी वाल्हे मार्गे वाल्हेगावांतर्गत गाड्या सुसाट दामटून नीरा पिंपरेच्या दिशेने पळून गेले.
या चोरीमध्ये सात तरुण सहभागी असल्याचे प्रत्यक्षदर्शी तरूणांनी सांगितले. या प्रकारानंतर हरणी परिसरामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाल्याचे सरपंच धनंजय यादव यांनी सांगितले. तसेच, ग्रामस्थांनी सावध झोपावे, चोरीबाबत काही शंका आल्यास याबाबत इतरांना मोबाईद्वारे कल्पना देण्याबाबत आवाहन केले आहे.
सासवडचे पोलिस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी प्रत्यक्ष घटनास्थळांची पाहणी करून पंचनामा केला.