
लुप्त झालेल्या ''खोरवांग्या''ची बहरतीये शेती
यवत, ता. ८ : अंजीर उत्पादनाचे गाव म्हणून देश पातळीवर पोहोचलेल्या खोर (ता. दौंड) गावातून ''खोर वांगी'' हा वांग्याचा वाण लुप्त झाला होता. मात्र, ''सकाळ''च्या ''बदलती गावे'' या सदरात हे वाचनात आल्यावर येथील तरुण शेतकरी समीर डोंबे याने या वांग्याला पुन्हा पूर्वीचे गतवैभव प्राप्त करून देण्यात यश मिळविले आहे. यामुळे खोरभागात खोरवांग्याची शेती बहरत आहे.
खोरवांगे हा वांग्याचा एक वेगळाच वाण आहे. काटेरहीत झाड आणि फळ असल्याने ते हाताळण्यास सोपे तर आहेच मात्र चवीलाही ते सरस आहे. अलीकडच्या काळात हायब्रिड बियाने, किटक नाशके, रासायनिक खते यांचा वापर करून विविध वान बाजारात आले. त्यामुळे हळूहळू खोर वांग्याची पिछेहाट होत गेली. ती इतकी की हे वांगे पाहायला मिळेणासे झाले.
अंजीर शेती व फळ प्रक्रियेतील नवनव्या प्रयोगांमुळे समीर डोंबे यास तालुका, जिल्हा, राज्य व देश पातळीवरील विविध संस्थांकडून व शासनाकडूनही पुरस्कार मिळाले. त्यामुळे खोर गावासोबत समीरचे नाव देशभर झळकले. याच समीरने इतर शेतकऱ्यांच्या मदतीने खोर वांग्याला गतवैभव प्राप्त करून देण्याचा चंग बांधला. आपल्या घराच्या परबागेत हा वाण टिकून होता. त्याच वांग्यापासून बी उत्पादन केले. त्याची रोपे तयार केली आणि आपल्या अंजीरशेतीत आंतरपीक म्हणून दहा गुंठे क्षेत्रात खोर वांग्याची प्रायोगिक तत्त्वावर लागवड केली. या वांग्याची वैशिट्ये व ती रसायन मुक्त असल्याची खात्री त्याने ''किसान कनेक्ट'' या कंपनीला करून दिली. या कंपनीच्या माध्यमातून सुमीरने सुमारे एक हजार किलो वांग्यांची विक्री केली. त्यात त्याला सुमारे ७५ हजार रुपयांची कमाई झाली.
बाजारभाव पाहून शेतकऱ्यांना उद्युक्त
''किसान कनेक्ट'' कंपनीच्या प्रयोगाने आत्मविश्वास वाढलेल्या समीरने हमीभावाची खात्री देत इतर शेतकऱ्यांना यासाठी उद्युक्त केले आहे. यास संभाजी डोंबे, उत्तम डोंबे, बाळासाहेब डोंबे, युवराज डोंबे यांनी प्रतिसाद देत या वाणाची नुकतीच लागवड केली आहे. या वांग्याला मिळणारा बाजारभाव पाहून इतरही अनेक शेतकरी सहभागी होतील, असा विश्वास या शेतकऱ्यांनी व्यक्त केला.
खोर गावाच्या नावाने एकेकाळी खोर वांगे परिचित होते. गावामुळे वांग्याचे तर वांग्यामुळे गावाचे नाव झाले होते. मधल्या काळात ही ओळख पुसली होती. समीर व इतर शेतकरी बांधवांच्या प्रयत्नाने ही ओळख पुन्हा मिळत आहे याचा सरपंच म्हणून मला अभिमान वाटतो.
वैशाली अडसूळ, सरपंच खोर (ता.दौंड)
00339, 00338
Web Title: Todays Latest District Marathi News Yat22b00178 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..