यवतमध्ये पुणे पोलिसांवर गोळीबार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यवतमध्ये पुणे पोलिसांवर गोळीबार
यवतमध्ये पुणे पोलिसांवर गोळीबार

यवतमध्ये पुणे पोलिसांवर गोळीबार

sakal_logo
By

यवत, ता. ९ : यवत (ता. दौंड) येथील मानकोबा वाडा परिसरात मंगळवारी (ता. ८) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास निहालसिंग मन्नूसिंग टाक या आरोपीने पुणे युनिट १च्या पोलिस पथकावर गोळीबार केला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही, अशी माहिती यवतचे पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली.
उत्तमनागर (पुणे) येथील घरफोडीतील आरोपीच्या पाळतीवर असलेल्या पुणे शहर पोलिसांच्या (युनिट १) पथकाला आरोपी लकीसिंग गब्बरसिंग टाक हा यवत येथे येणार असल्याची माहिती मिळाली. संबंधित ठिकाणी या पोलिस पथकाने सापळा लावला. अपेक्षेप्रमाणे लकीसिंग टाक आपल्या साथीदारासह रात्री ११च्या सुमारास दुचाकीवर त्या ठिकाणी आला. त्यास पोलिसांनी शिताफीने पकडलेही. मात्र, त्याच्या सोबत असलेल्या निहालसिंग टाक याने पोलिसांच्या हाताला हिसका मारत पळ काढला. जाताना पोलिसांनी आपला पाठलाग करू नये, यासाठी त्यांच्या दिशेने गोळीही झाडली. त्यात पोलिस हवलदार प्रकाश कट्टे हे थोडक्यात बचावले. गोळीबार करणारा निहीलसिंग पळून जाण्यात यशस्वी झाला. मात्र, ज्याच्या मागावर पोलिस होते, त्या लकीसिंगला पकडण्यात मात्र पोलिस पथकाला यश आले.
या कारवाईमध्ये सहभागी असलेल्या पोलिस पथकामध्ये सहायक पोलिस निरीक्षक संतोष क्षीरसागर, पोलिस हवालदार दीपक क्षीरसागर, प्रकाश कट्टे, प्रकाश पडवळ यांचा समावेश होता. पोलिस निरीक्षक नारायण पवार व उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांनी घटनास्थळी भेट दिली. निहालसिंग याच्यावर यवत पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले.