वीज खंडित केल्याने शेतकरी संतप्त ् | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वीज खंडित केल्याने शेतकरी संतप्त            ्
वीज खंडित केल्याने शेतकरी संतप्त ्

वीज खंडित केल्याने शेतकरी संतप्त ्

sakal_logo
By

यवत, ता.१९ : यवत परिसरातील शेती पंपांचा वीजपुरवठा कोणतीही पूर्वसूचना न देता खंडित करण्यास कालपासून (ता.१८) सुरुवात केली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयाकडे धाव घेतली. मात्र तेथील अधिकाऱ्याने उडवाउडवीची उत्तरे देत तेथून पळ काढला, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतीपंप बंद पडल्याने शेतकऱ्यांकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पावसाळ्यात अतिवृष्टी व त्यानंतर अवकाळी, शेतमालाचे पडलेले बाजारभाव अशा एकामागून एक अस्मानी सुलतानी संकटांमुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता यवत परिसरात शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरण ने सुरू केली आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. आम्हाला वीज बिले दिलेली नाहीत, कोणतीही पूर्वसूचना दिलेली नाही, असे असताना वीज पुरवठा खंडित करण्याचा धडाका सुरू केला आहे. सुमारे सत्तर रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित करण्यात केला आहे. वीज पुरवठा खंडित केलेल्या भागातील बहुतांश शेतकरी फुलशेती करणारे आहेत. अवकाळीने फूल शेतीचे आधीच नुकसान झाले आहे. त्यातच ऐन हंगामात फुलांना अपेक्षित भाव मिळाला नाही. त्यामुळे झालेल्या आर्थिक नुकसानीची कशीबशी तोंडमिळवणी करत आहोत. त्यातच महावितरणने वीजेचे संकट नव्याने पदरात टाकले आहे. दरम्यान, याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी दाद दिलेली नाही.


वर्षांच्या सुरुवातीपासूनच वीजपुरवठा नियमीत नाही. त्यातच अतिवृष्टी व अवकाळीने शेतमालाचे मोठे नुकसान झाले. हे कमी की काय आता पुन्हा वीजपुरवठा खंडित करून शेतकऱ्यांच्या सहनशिलतेचा अंत पाहिला जात आहे. या समस्येची दखल घेण्यासाठी पोलिसांना निवेदन दिले आहे. तरीही दखल न घेतल्यास आम्हाला तीव्र आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही.
- पंडित (भाऊ) दोरगे, फूल उत्पादक शेतकरी, यवत

यवत महावितरणला आम्हाला निटपणे वीज द्यायचीच नसेल तर त्यांनी आमच्या शेतातील खांबही काढून घ्यावे. आम्हाला किमान विजेची आशा तरी राहणार नाही.
- हेमंत दिवेकर, संतप्त शेतकरी
----------------------------
00516