
धान्याचा काळा बाजार करणारे जेरबंद
यवत, ता. ४ : सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून वितरण करण्यासाठी असलेले धान्य काळ्या बाजारात विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण व यवत पोलिसांना यश आले.
स्थानिक गुन्हे अन्वेशनच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार कासुर्डी टोल नाका (ता. दौंड) येथे सापळा लावण्यात आला होता. त्यानुसार बुधवारी (ता. ४) पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार टाटा २०७ (क्र. एमएच १२ जीटी ०३३६ व एमएच १२ क्यू जी ३४९७) व अशोक लेलंड (क्र. एमएच १२ एसएक्स २००१) ही वाहने टोलनाका ओलांडत असताना त्यांना पोलिस पथकाने थांबवले. या वाहनांच्या चालकांना पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांनी संबंधित प्रकाराची सर्व माहिती पोलीसांना दिली. तीनही वाहनांच्या चालकांनी सांगितल्यानुसार, हा माल जावेद लालू शेख, काशीम शेख व अमोल कंधारे (तिघेही रा, काशीवाडी, पुणे) यांचा असून, हा माल किशोर होळकर (रा. केडगाव, ता. दौंड) यांच्याकडे घेऊन जात असल्याचे कबूल केले. स्थानिक गुन्हे अन्वेशच्या पथकाने यवत पोलिसांत चालक मुकेश नरसिंगराव यादव (वय २१, रा. बिबवेवाडी, पुणे), भाऊ अर्जुन कुटे (वय ३७, रा. गुलटेकडी, पुणे), सादिक इलाहीबक्ष अलबेलकर (वय ५५, रा. काशीवाडी भवानीपेठ, पुणे) या ताब्यात घेतलेल्या आरोपींसह जावेद लालू शेख, कासीम शेख, अमोल कंधारे, अब्बास अब्दुल सरकावस (सर्व रा. काशीवाडी, पुणे) आणि किशोर होळकर (रा. केडगाव ता. दौंड) यांच्यावर जीवनावश्यक वस्तू कायदा कलम अंतर्गत गुन्हे दाखल केले.