दौंडमधील तरुणाईला हॉटेल व्यवसायाची गोडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दौंडमधील तरुणाईला
हॉटेल व्यवसायाची गोडी
दौंडमधील तरुणाईला हॉटेल व्यवसायाची गोडी

दौंडमधील तरुणाईला हॉटेल व्यवसायाची गोडी

sakal_logo
By

दौंडमधील तरुणाईला
हॉटेल व्यवसायाची गोडी

दौंड तालुक्यातील विशेषतः यवत परिसरातील शेतकरी कुटुंबातील तरुणांनी हॉटेल व्यावसायात जिद्दीने पाय रोवण्यास सुरवात केली आहे. यवतजवळून जाणारा पुणे-सोलापूर महामार्ग ही त्यांच्यासाठी एक जमेची बाजू आहे. मात्र, व्यावसायासाठी लागणारी कौशल्य, त्यासाठी लागणारी जिद्द, कष्ट करण्याची तयारी आणि विशेष म्हणजे आव्हानांचा सामना करण्याचे धाडस या जिवावर येथील अनेक तरुणांनी या व्यवसायात चांगलेच पाय रोवले आहेत. यातील काही तरुण आपल्या खास पदार्थांमुळे; तर काहींनी नियोजनातील वेगळेपणामुळे यश संपादन केले आहे.

- हितेंद्र गद्रे, यवत

दौंड तालुक्यात हॉटेल व्यवसायात असलेल्या तरुणाईमध्ये व्यवसाय करण्याच्या पद्धतीत विविधता आढळते. प्रत्येकाचे कौशल्य वेगळे आहे. प्रत्येकाच्या हॉटेलमध्ये वेगळेपण आहे. कोणी वडिलांचा व्यवसाय विस्तारला आहे, तर कोणी नव्याने व्यवसाय उभा करून तो नावारूपाला आणला आहे. कोणी आपल्या जुन्या व्यावसायात पूरक व्यवसाय म्हणून हॉटेल व्यवसायाची निवड केली आहे, कोणी शुद्ध शाकाहारी; तर कोणी मांसाहारी, कोणाचे नाष्ट्याचे हॉटेल; तर कोणाचे जेवणाचे, कोणाचा डायनिंग हॉल; तर कोणाचा कॅफे. कोणाचा ढाबा; तर कोणाचे पार्टी लॉन. मात्र, आपल्याच गावात या सुशिक्षित तरूणांनी व्यवसाय सुरू करून तो नावारूपाला आणला आहे. या तरुणांकडून प्रेरणा घेण्यासारख्या अनेक बाबी आहे. प्रत्येकाचा व्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. असे असले तरी नावीन्य, चिकाटी, व्यवसायावरील निष्ठा हे गुण या सर्वांमध्ये समान असल्याचे पहावयास मिळतात.

तरूणांनी वेगळ्या वाटा
निवडल्या पाहिजेत
शेतकरी कुटुंबातील मुलांनी केवळ शेती आणि नोकरी हेच पर्याय न वापरता व्यवसायाच्या वेगळ्या वाटा निवडल्या पाहिजेत. आपली कौशल्य व चिकाटी पणाला लावली, तर यश मिळतेच. शेतीतल्या वेगळ्या प्रयोगांसोबतच वेगवेगळ्या व्यवसायात उतरण्याचे धाडस केले पाहिजे. नोकरी मागणारे बनण्याऐवजी नोकरी देणारे बनण्याची यामुळे संधी मिळू शकते. आपल्या मातीतील आपल्या माणसांसाठी आपण काहीतरी करू शकलो, याचे समाधान मिळते ते वेगळेच. दौड तालुक्यातील विशेषतः महामार्गालगतच्या भागासाठी हॉटेल व्यवसाय हा एक उत्तम पर्याय आहे.
- अक्षय भोंडवे, ए.जी.एस. रेस्टॉरंट, कासुर्डी

वडिलांनी सुरू केलेला
व्यवसाय नेला वाढवत
वडील मधुकर दोरगे यांनी सुरू केलेले हॉटेल आता आम्ही भावंडे मिळून सांभाळत आहोत. साध्या हॉटेलपासून सुरू झालेल्या या हॉटेलने अल्पावधीतच भरारी घेतली आहे. घराला राजकीय वारसा असला, तरी त्याचा व्यवसायावर कोणताही परिणाम होऊ द्यायच नाही, हे धोरण ठेऊन आजवर हॉटेलसोबत लॉजींगसह अनेक गोष्टी विकसित केल्या आहे. राहण्या जेवण्याची सर्वोत्तम सुविधा म्हणून परिसरात हॉटेलचा नावलौकीक आहे. बंधू सतीश व अभिषेक हे पूर्णवेळ; तर आम्ही इतर व्यवसाय सांभाळत हॉटेलचा कारभार सांभाळण्यात मदत करत असतो.
- संतोष दोरगे, हॉटेल यशोदा, भांडगाव

वडीलांच्या चहाने दिली
आम्हाला संजीवनी
अतिशय प्रतिकूल परिस्थिती महत्प्रयासाने हॉटेल नावारूपाला आणले आहे. तीस-चाळीस वर्षांपूर्वी हॉटेलमध्ये काम करण्यासाठी वडील यवतला आले. त्यांनी चहाचे छोटे हॉटेल पत्र्याच्या शेडमध्ये सुरू केले. त्यांचा चहा हळूहळू यवतची ओळख बनला. हाच चहा आमच्या कुटुंबासाठी व व्यावसायासाठी संजीवनी ठरला. वडिलांनी सुरू केलेल्या हॉटेलवर विसंबून न राहता पर्यायी जागेत स्वतंत्र व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. हळूहळू हे हॉटेल इतके लोकप्रिय झाले, की लोक माझ्याकडे फ्रांचायशी मागू लागले. निर्जन ठिकाणी गर्दी करणारे हॉटेल म्हणून आता कौतुक ऐकताना त्यासाठी घेतलेले कष्ठ कायम डोळ्यासमोर येतात.
- प्रशांत (बंटी) देवकर, हॉटेल साईकृपा, यवत

व्यावसायात टिकण्यासाठी
पर्यायी मार्गांचा वापर हवाच
यवत येथे माझा चिकन विक्रीचा व्यावसायात आजही जोमात आहे. मात्र, त्यावरच विसंबून राहणे कधीही धोक्याचे ठरू शकते. व्यवसायत टिकून रहायचे असेल; तर पर्याय हाती ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी मी समुद्र मासळीची थाळी लोकांना उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘कांचन सीफूड’ नावाने एक छोटेखानी हॉटेल सुरू केले. सुरवातीपासून त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. हॉटेललगत मोक्याची जागा उपलब्ध झाल्याने तेथे आता पार्टीलॉनही सुरू केले आहे. त्यासही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
- दीपक कदम, हॉटेल कांचन सीफूड, यवत

स्वतःच्या कौशल्याचा
मित्रांनाही उपयोग व्हावा
मी स्वतः आयटी कंपनीत इंजिनिअर आहे. मात्र, व्यवसाय करण्याची आवड व कला माझ्याकडे आहे. याचा उपयोग स्वतःसोबतच मित्रांनाही व्हावा, यासाठी ‘हॅशटॅग ७२’ ही हॉटेल साखळी सुरू करण्याचा प्रयत्न सुरू केली. त्यात चांगले यशही मिळत आहे. स्वतःचे भांडवल आणि गरजू मित्रांचा सहभाग ही ‘हॅशटॅग ७२’ची थीम आहे. सुरवातील यवत येथे कॅफे सुरू केला. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. त्यात महिलांसाठी स्वतंत्र विभाग सुरू केला. त्यासोबतच भुलेश्वर फाटा येथे छोटेखानी हॉटेल सुरू केले. शहरी पर्यटकांना आकर्षित करेल, अशी या हॉटेलची रचना केली आहे. त्यासही चांगला प्रतिसाद मिळत आहे. केडगाव व चौफुला येथेही अशीच हॉटेल सुरू केली आहेत.
- दीपक मलभारे, हॉटेल हॅशटॅग ७२, यवत

घरच्या व्यवसायातच
पाय रोवून उभा राहिलो
आमच्या कुटुंबीयांचे यवत येथील फार जुने हॉटेल आहे. मावशींची खानावळ म्हणून सुरू झालेले हे हॉटेल पुढच्या पिढीने वाढवत नेले. खानावळीचे स्वरूप बदलून यवत येथे त्याचे रूपांतर प्रशस्त हॉटेलमध्ये झाले. महालक्ष्मी हॉटेल म्हणजे मटण खाणाऱ्या खवय्यांचे आवडीचे ठिकाण. महामार्गाने प्रवास करणाऱ्यांचे व यवतच्या आठवडे बाजारासाठी येणाऱ्यांचे हे आवडीचे हॉटेल. आता आमची तिसरी पिढी हे हॉटेल चालवत आहे. या हॉटेलची लज्जत पुणेकरांना देण्यासाठी हडपसर येथे महालक्ष्मी नावानेच प्रशस्त हॉटेल नुकतेच सुरू केले आहे.
- विशाल भोसले, हॉटेल महालक्ष्मी, यवत