
उसात मेथीचे आंतरपीक घेतल्याने वाढले उत्पन्न
यवत, ता.२३ : कासुर्डी (ता. दौंड) येथील गोपीनाथ भोंडवे यांनी आपल्या एक एकर उसाच्या शेतीमध्ये मेथीचे आंतरपीक घेतले आहे. सध्या मेथीला पुणे तसेच तालुक्यातून मोठी मागणी आहे. यामुळे त्यांचे उत्पन्न वाढले आहे. या प्रयोगामुळे ऊस तोडीपर्यंत चांगला फायदा होणार असल्याचा विश्वास भोंडवे यांना आहे.
उगवणीच्या काळात उन्हामुळे हे मेथीचे पीक करपण्याची शक्यता जास्त असते. यामुळे अनेकदा उत्पादन खर्चही भागत नाही. उसात आंतरपीक घेतले तर उसाच्या पानांची सावली या पिकाला उन्हाच्या तडाख्यापासून संरक्षण देते. त्याचे करपण्याचे प्रमाण कामालीचे कमी होते. त्यामुळे उत्पादन वाढते आणि भावही चांगला मिळतो. याच सुत्राचा वापर करून भोंडवे यांनी खोडव्याच्या फुटीनंतर लगेचच मेथीचे आंतरपीक घेतले. सरी पद्धतीने लागवड केलेल्या उसाची तोडणी झाल्यावर त्यांनी पुन्हा खोडवा धरला. फुटी नंतर खोडव्याची बांधणी केली. खोडव्याच्या फुटीमुळे सावली झाल्याने मेथीची उगवण चांगली झाली. दरम्यान, उन्हाळ्याचे दिवस सुरू झाल्याने मेथीचे घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल कमी असतो. परिणामी मेथीला चांगला भाव मिळण्याची याची भोंडवे कुटुंबीयांना खात्री आहे, गोपीनाथ भोंडवे यांचा मुलगा अक्षय याने ''सकाळ''शी बोलताना सांगितले.
मेथीचे पीक उन्हाळ्यात घेण्याचे अनेक शेतकरी टाळतात. पाणी देण्याची वेळ आणि उन्हाचा तडाखा यांचे गणित न जुळल्यास या पिकाला धोका असतो. उसात हे पीक घेतल्याने उन्हापासून पिकाचे चांगले संरक्षण होतो. या मेथीचे पीक भरघोस येते व चांगला फायदा होतो.
- गोपीनाथ भोंडवे. शेतकरी कासुर्डी (ता. दौंड)
00649