
खडी मशिन होण्याच्या चर्चेने खोरमधील शेतकरी धास्तावले खोर येथे शेतकरी धास्तावले
यवत, ता. ४ : खोर (ता. दौंड) गावात खडी मशिन सुरू होणार, अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे आपल्या शेतीला व गावाच्या पर्यावरणाला धोका पोहोचणार, याची चिंता ग्रामस्थांमध्ये पसरली आहे. अंजीर शेतीने येथील शेतकऱ्यांना चांगले दिवस आणले आहेत. त्यामुळे खडीमशिन येथील अंजीर शेतीला खाऊन टाकेल, अशी भीती शेतकरी व्यक्त करू लागले आहेत.
खोर हे दौंड तालुक्यातील अवर्षण पट्ट्यातील गाव आहे. मात्र, विविध पिकांच्या उत्पादनांमुळे हे गाव मागील अनेक वर्षांपासून चर्चेत राहिले आहे. सन १९७२च्या दुष्काळाच्या सुमारास येथील वांगी प्रसिद्ध होती. खोर वांगी म्हणून तो वाण परिचित होता. कालांतराने कांद्याच्या पिकाला महत्त्व आले आणि खोरचा कांदा बाजारपेठेत भाव खाऊ लागला. मागील चाळीस-पन्नास वर्षांपासून येथे अंजीर लागवडीला सुरवात झाली. हळूहळू येथील अंजिराची गोडीही विविध बाजारपेठांना लागली. मागील काही वर्षांपासून येथील अंजीर देशपातळीवर खोरचे नाव गाजवत आहे.
अंजीर शेतीने येथील शेतकऱ्यांना चांगले दिवस आले आहे. परंतु, त्यावर हे खडी मशिनचे संकट घोंगाऊ लागले आहे. खडी मशिनच्या धुळीने अंजीर शेतीचा जीव गुदमरणार, या विचाराने लोक धास्तावले आहेत. याबाबत कोणतीही तक्रार नाही, ग्रामपंचायतीने कोणालाही परवानगी अथवा ना हरकत दाखला दिलेला नाही, असे ग्रामपंचायत प्रशासनाकडून सांगण्यात आले. तालुक्यातील भांडगाव व वासुंदे या गावच्या शेतकऱ्यांचा वाईट अनुभव आमच्याही पदरी येणार का, याची चिंता शेतकरी करत आहेत.
कष्टाने येथील शेतकऱ्यांनी शेती नावारूपाला आणली आहे. शेतीवर जर संकट आले आणि आम्ही त्याची दखल घेतली नाही, तर पुढच्या पिढीला काय सांगणार आहोत?
- समीर डोंबे, प्रयोगशील शेतकरी