कोकणच्या शेतकऱ्यांनी अनुभवली अंजीर शेती

कोकणच्या शेतकऱ्यांनी अनुभवली अंजीर शेती

यवत, ता. २१ : कृषी विभागाच्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेअंतर्गत कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला, सावंतवाडी, कुडाळ या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी प्रक्षेत्र भेट व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात सुमारे साठ शेतकरी सहभागी झाले होते. खोर (ता. दौंड) येथील अंजीर शेती, पवित्रक शेतकरी उत्पादक कंपनी व डोंबेपाटील फुड्स प्रा. लि. या ठिकाणांना शेतकऱ्यांनी भेट दिली.
खोर येथे पवित्रक शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून येथील शेतकरी स्वतः अंजीर विक्री व प्रक्रियेसाठी पुढाकार घेत आहेत. डोंबेपाटील फूड्स या कंपनीद्वारे अंजिरावर प्रक्रीया करून अंजीर जाम, जेली यांसारखी उत्पादने घेतली जात आहेत. याची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. त्याचबरोबर अंजीर पीक पद्धती, अंजिरातील अच्छादन, पाणी व्यवस्थापन, जैविक खतांचे महत्त्व, अंजीर प्रक्रीया, शेतकरी उत्पादक कंपनी या विषयी आत्माचे तंत्रज्ञान व्यवस्थापक महेश रूपनवर यांनी या शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
शेतीकडे व्यावसायाच्या दृष्टीने कसे पहावे या विषयी डोंबेपाटील फूड्सचे समीर डोंबे यांनी मार्गदर्शन केले. गणेश तांबे, आदेश डोंबे यांनी प्रक्रीया व विक्री व्यवस्थापन या विषयी मार्गदर्शन केले. बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राचे विशेषज्ञ यशवंत जगदाळे, तुषार जगताप यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी कोकणचे कृषी पर्यवेक्षक यशवंत गवाणे उपस्थित होते.

आम्ही तरुण मिळून अंजीर उत्पादन, विक्री व प्रक्रियेमध्ये जे करत आहोत तेच कोकणातीत आंबा, काजू, फणस, नारळ यांसारख्या कृषी उत्पादन व प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. तसे झाले तर उत्पन्न व्यापाऱ्यांऐवजी शेतकऱ्यांच्या पदरी पडेल. कोकणात आंबा शेती हा दुय्यम उत्पादनाचा स्रोत न समजता त्यास तरूणांनी प्राथमिक उत्पादनाचा स्रोत म्हणून काम केले पाहिजे.
समीर डोंबे, अंजीर उत्पादक शेतकरी, खोर (ता. दौंड)

अंजीर शेती प्रमाणे कोकणातील आंबा शेतीमध्ये करण्यासारखे खूप आहे. याची जाणीव येथील उपक्रम पाहून झाली. मात्र कोकणातील तरुणांचा शेतीऐवजी नोकरीकडे कल जास्त आहे. आंबा उत्पादन, विक्री आणि प्रक्रीया यासाठी तरूणांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. तसे झाले तर कोकणच्या आंब्याची गोडी खऱ्या अर्थाने कोकणचा शेतकरी चाखू शकेल.
दामोदर सोनसुकर, शेतकरी सिंधुदुर्ग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com