
भांडगावजवळ बस उलटली
यवत, ता. २५ : पुणे-सोलापूर महामार्गावर भांडगाव (ता. दौंड) येथे सोमवारी (ता. २४) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास खासगी प्रवासी बसचा अपघात झाला. त्यात बस महामार्गावरच कलंडली. त्यात सुमारे दहा प्रवासी जखमी झाले. अपघातानंतर चालक पळून गेला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
पुण्याहून सोलापूर बाजूकडे भरधाव जाणाऱ्या एका खासगी बसला (क्र. पी.वाय. ०१ सी.एस. २५५२) भांडगाव येथील ‘हॉटेल झोपडी’जवळ दुचाकी समोर आल्याने चालकाने अचानक ब्रेक दाबले. यामध्ये बस रस्त्यावरच आडवी झाली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक तरूणांच्या मदतीने बचाव कार्य सुरू केले. उद्योजक संदीप दोरगे यांनी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी रुग्णवाहिका व बस सरळ करण्यासाठी क्रेन उपलब्ध करण्यास मदत केली.
या अपघातामध्ये राहुल गंगाधर तरटे (रा. नांदेड), नेहारीका नागनाथ हांडे, शकुंतला दिगंबर वाळके, साक्षी नागनाथ हांडे (तिघी रा. देहू), विग्नेश रमेश गकुला (रा. उमरगा, जि. धाराशिव), पुष्पराज हनुमंत पाटील (रा. नांदेड), ऐरना जठार गुमेरला (निजामाबाद), माणिकेम मुतीराज जकाला, मुनीराज मुताबा जकाला, सुलोचना कृष्णा रेड्डी (तीघे रा. करीमनगर), असे दहा प्रवासी जखमी झाले. बस चालक हनुमंत जाधव (रा. नांदेड) याच्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली.