
यवत- वरवंडला पालखी मुक्कामाची जय्यत तयारी
यवत, ता. १० ः संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे दोन मुक्काम दौंड तालुक्यात असतात. यातील पहिला मुक्काम यवत येथे तर दुसरा वरवंड येथे असतो. या दोन्ही गावांमध्ये स्थानिक प्रशासन व ग्रामस्थांकडून सोहळ्याचे व सोहळ्यात सहभागी वारकऱ्यांचे स्वागत व सुविधा करण्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे.
पालखी सोहळ्याचा दौंड तालुक्यातील पहिला मुक्काम यवत येथे असतो. ग्रामपंचायत प्रशासनासोबतच संपूर्ण गाव पालखी सोहळ्याच्या स्वागताच्या तयारीत गुंतलेले असते. दर वर्षी गावाच्या वतीने संपूर्ण सोहळ्यासाठी पिठलं भाकरीचे जेवण दिले जाते. त्याची पूर्ण तयारी ग्रामस्थांकडून केली जाते. ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिराच्या भटारखान्यात पिठलं आणि भाकरी बनवण्याचा सोहळाच मुक्कामाच्या दिवशी सुरू असतो. पालखी स्वागतासाठी स्वागत कमान, पथदिवे, दीपमाला यांच्या माध्यमातून आरास केली जाते. ग्रामदैवत श्री काळ भैरवनाथ व माता लक्ष्मीदेवीच्या मंदिरावर रोषणाई केली जाते. संपूर्ण बाजारतळ, शाळेचे मैदान व इतर मोकळ्या जागांचा वापर मुक्कमासाठी वारकरी करत असतात. त्यासाठी गावात हॅलोजन लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. वारकऱ्यांच्या अंघोळीसाठी शाळेच्या व मंदिरांच्या कुंपण भिंतींना पाचशेहून अधिक नळांची व्यवस्था करण्याचे काम सुरू झाले आहे. त्याचबरोबर सर्व शासकीय विभागाचे प्रतिनिधी एकत्र भेटावेत यासाठी गावाच्या मुख्य चौकात नियंत्रण कक्षाची उभारणी करण्यात येत आहे. वारकऱ्यांना प्रथमोपचाराची त्वरित सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी नियंत्रण कक्षा शेजारीच आरोग्य कक्ष उभारण्यात येणार आहे. सोहळ्यासोबत असलेल्या दिंड्या विविध ठिकाणी मुक्कामास असतात. त्यांना वीज जोड घेणे सोपे जावे यासाठी जागोजागी बोर्डची (प्लगची) सुविधा करण्यात येत आहे.
एक हजार मोबाईल टॉयलेटची सुविधा
दरवर्षीप्रमाणे निर्मल वारी या शासनाच्या उपक्रमातून सुमारे एक हजार मोबाईल टॉयलेटची सुविधा मुक्कामा दिवशी उपलब्ध होणार आहे. ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, महावितरण, महसूल विभाग, पाटबंधारे विभाग, पोलिस, जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रशासनाच्या मदतीने सोहळ्याच्या दोन्ही मुक्कामात कोणतीही अडचण येणार नाही, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.