लोगो ः जिल्हा बॅंक निवडणूक दोन माजी अध्यक्षांची तारेवरची कसरत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोगो ः जिल्हा बॅंक निवडणूक 
दोन माजी अध्यक्षांची तारेवरची कसरत
लोगो ः जिल्हा बॅंक निवडणूक दोन माजी अध्यक्षांची तारेवरची कसरत

लोगो ः जिल्हा बॅंक निवडणूक दोन माजी अध्यक्षांची तारेवरची कसरत

sakal_logo
By

पुणे, ता. २३ : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या (पीडीसीसी) संचालक मंडळाच्या निवडणुकीत जिल्हा बॅंकेच्या प्रकाश म्हस्के (हवेली) आणि आत्माराम कलाटे (मुळशी) या दोन माजी अध्यक्षांना आता विजयासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे, हे दोघेही जिल्हा बॅंकेचे विद्यमान संचालक आहेत. यापैकी म्हस्के हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. मात्र, त्यांना पक्षाची अधिकृत उमेदवारी नाकारण्यात आली आहे. येथून राष्ट्रवादी कॉँग्रेसचेच विकास दांगट यांच्यासोबत म्हस्के यांचा मैत्रीपूर्ण सामना रंगणार आहे. मुळशी तालुक्यातील आत्माराम कलाटे हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे, परंतु मध्यंतरी त्यांनी पक्ष सोडल्याने यंदा त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. येथून राष्ट्रवादीने सुनील चांदेरे यांच्या माध्यमातून नवीन चेहऱ्याला संधी दिली आहे.

म्हस्के आणि कलाटे हे दोघेही अनुक्रमे हवेली आणि मुळशी तालुका ‘अ’ वर्ग मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. हवेली तालुका मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्याच दोन तुल्यबळ उमेदवारांनी उमेदवारी मागितली होती. त्यामुळे या दोघांपैकी कोणालाही पक्षाची अधिकृत उमेदवारी न देता, मैत्रीपूर्ण लढतीसाठी हा मतदारसंघ सोडल्याचे या पक्षातर्फे याआधीच जाहीर केले आहे.

आत्माराम कलाटे यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. लोकसभा निवडणुकीत त्यांनी मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराचा जाहीर प्रचार केला होता. याच लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉँगेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे राष्ट्रवादीकडून निवडणूक रिंगणात होते. यात पवार यांचा पराभव झाला. मुलाच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी आणि कलाटे यांना धडा शिकविण्याच्या उद्देशानेच राष्ट्रवादीने येथून नवीन व तरुण चेहऱ्याला संधी दिल्याची चर्चा जिल्हा बॅंकेत रंगली आहे. सध्या कलाटे कोणत्याच पक्षात नसून, ते अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवीत आहेत.