ग्रामीण भागात लसीकरणाचा वेग वाढवा

कोरोना प्रतिबंधासाठी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचा आदेश

ग्रामीण भागात लसीकरणाचा वेग वाढवा कोरोना प्रतिबंधासाठी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचा आदेश

पुणे, ता. ३ ः ‘‘पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवा आणि कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी आतापासूनच सतर्क राहून प्रभावी उपाययोजना करा,’’ असा आदेश राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सोमवारी (ता.३) जिल्हा आणि जिल्हा परिषद प्रशासनाला दिला.

गृहमंत्री वळसे पाटील यांनी सोमवारी सरकारी विश्रामगृहात आंबेगाव व शिरूर या दोन तालुक्यातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे, आंबेगावचे उपविभागीय अधिकारी सारंग कोडलकर, शिरूरचे उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

वळसे-पाटील म्हणाले, ‘‘कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी आतापासूनच आपण सर्वांनी सतर्क राहून अधिक वेगाने उपाययोजनांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. यासाठी कोरोना चाचण्या व उपचारावर भर देण्यासोबतच नागरिकांच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला प्राधान्य दिले पाहिजे. यासाठी लसीकरणाचा वेग वाढविला पाहिजे. ग्रामीण भागातील १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यासाठी अत्यंत काटेकोर नियोजन करावे.’’

या बैठकीत त्यांनी औषधाचा पुरेसा साठा, उपचार सुविधा, मनुष्यबळ उपलब्धता, चाचण्यांचे प्रमाण, लसीकरण याबाबतच्या सद्यःस्थितीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी वळसे पाटील यांना जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती, लसीकरण आणि तिसऱ्या लाटेबाबत करण्यात आलेल्या संभाव्य नियोजनाची माहिती दिली. कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता, लसीकरण मोहिमेसाठी मिशन मोडवर गावनिहाय लसीकरण प्लॅन तयार केला पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

आयुष प्रसाद म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील प्रत्येक गावात लसीकरण केंद्र सुरू करण्याचे नियोजन आहे. यासाठी सरपंच, ग्रामसेवक आणि अन्य यंत्रणांनी सहभाग घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शालेय विद्यार्थ्यांच्या लसीकरण, हॉस्पिटल, औषधोपचार आणि अन्य व्यवस्थेबाबतही त्यांनी माहिती दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com