प्रक्रियायुक्त सांडपाणी पुनर्वापराला नवा आयाम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रक्रियायुक्त सांडपाणी पुनर्वापराला नवा आयाम
प्रक्रियायुक्त सांडपाणी पुनर्वापराला नवा आयाम

प्रक्रियायुक्त सांडपाणी पुनर्वापराला नवा आयाम

sakal_logo
By

पुणे, ता. ७ ः प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याच्या पुनर्वापरातून उत्पन्न मिळवत उत्तम जलव्यवस्थापन करण्यासाठी सुरत महापालिकेच्या धर्तीवर पुण्यातही सांडपाणी पुनर्वापराचा उपक्रम राबविला जाणार आहे. वाढत्या लोकसंख्येची, तसेच उद्योग-व्यवसायांची पाण्याची दीर्घकालीन गरज लक्षात घेऊन उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करण्याच्या दृष्टीने पुणे महापालिकेने पुढाकार घेतला आहे.

महापालिकेच्या सर्व विकासकामांसाठी प्रक्रिया केलेले सांडपाणीच वापरले जाईल, असा धोरणात्मक निर्णय महापालिकेने घेतला आहे. खासगी व्यावसायिकांतर्फेही बांधकामासाठी प्रक्रिया केलेले सांडपाणी वापरले जावे, यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. बांधकामांसाठी प्रक्रिया केलेले सांडपाणी वापरल्यास वर्षाकाठी ४० कोटी लिटर पिण्यायोग्य पाण्याची बचत होऊ शकते, असा विश्वास पुणे महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. सुरुवातीच्या काळात प्रक्रिया केलेले पाणी मोफत उपलब्ध करून दिले जाणार असले, तरी भविष्यात प्रक्रियायुक्त पाण्यातून उत्पन्नही मिळवता येईल.

‘स्वच्छ भारत अभियान’ आणि ‘अमृत’ या दोन महत्त्वाकांक्षी योजनांमधून शहरांना पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनविण्यासाठी केंद्र सरकारने धोरण आखून दिले आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करणे आणि पाण्याचा अधिकाधिक पुनर्वापर करणे, या दोन मुद्द्यांवर स्थानिक स्वराज्य संस्थांनी भर द्यावा, असे त्यात सुचविण्यात आले आहे. पाण्याची पुरेशी उपलब्धता नसलेल्या सुरत महापालिकेने अचूक जलव्यवस्थापन आणि धाडसी धोरणात्मक निर्णयांच्या जोरावर प्रक्रिया केलेले सांडपाणी बागकाम, शेती, रस्तेसफाई, बांधकामे आणि औद्योगिक वापरासाठी वापरण्याचा निर्णय घेतला. शहरात निर्माण होणाऱ्या एकूण सांडपाण्यापैकी तब्बल ३० टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याची विक्री केली जाते. ‘झीरो लिक्विड डिस्चार्ज’चे लक्ष्य गाठण्यासाठी सुरतने सन २०२५ पर्यंत ५० टक्के, तर २०३० पर्यंत १०० टक्के सांडपाण्याच्या पुनर्वापराचे नियोजन केले आहे. २०२१ मध्ये स्टॉकहोम येथे झालेल्या ‘वर्ल्ड वॉटर वीक’मध्ये सुरत महापालिकेने या सर्व उपक्रमांचे सादरीकरण केले. जागतिक पातळीवर कौतुक झालेल्या या उपक्रमामध्ये सुरत महापालिकेने आता परिसरातील उद्योगांनाही सामावून घेण्याचे ठरविले आहे. यानुसार, आता महापालिका विविध उद्योगांना सांडपाणी पुरविणार आहे आणि त्या त्या औद्योगिक क्षेत्रातच त्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. यातून सुरत महापालिकेचा सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा खर्चही वाचणार आहे आणि उद्योगांनाही स्वस्त दरात पाणी उपलब्ध होणार आहे.

पुणे शहरात दररोज ७४४ एमएलडी सांडपाणी तयार होते. त्यापैकी ५०० एमएलडी पाण्यावर प्रक्रिया केली जाते. सद्यःस्थितीत प्रक्रिया केलेले तीन एमएलडी पाणी महापालिकेच्या उद्यानांसाठी वापरले जाते. हे प्रमाण एक टक्क्याहूनही कमी असले, तरी प्रक्रिया केलेले अधिकाधिक पाणी पुनर्वापरात आणण्याचा प्रयत्न महापालिकेने सुरू केला आहे. मोठ्या इमारती व हॉटेलमधील कुलिंग टॉवर्ससाठी हे पाणी उपलब्ध करून देण्याचे पुणे महापालिकेच्या विचाराधीन आहे.


‘स्वच्छ भारत अभियाना’ची व्याप्ती केवळ ‘कचरा उचलणे’ इतपतच मर्यादित नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते वापरात आणायचे आणि त्यातून उत्पन्नाचा स्रोतही उभा करायचा, असा विस्तृत विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यातून मांडला आहे. पुणे महापालिकाही सांडपाण्याच्या पुनर्वापराबाबत सक्रियपणे काम करते आहे. यामुळे पुण्याच्या स्वच्छतेचा दर्जा आणखी उंचावणार आहे.
- गणेश बिडकर, सभागृह नेता

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top